अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेऊन एक दिवसही उलटत नाहीत तोच अमेरिकी महिलांनी न्यूयॉर्क ते लॉस एंजल्स या दरम्यान काढलेल्या मोर्चाला लाखो अमेरिकी नागरिकांनी रस्त्यावर उतरून जोरदार समर्थन दिले. या वेळी ट्रम्प यांची धोरणे आणि त्यांच्या महिलांविरोधाचा निषेध नोंदविण्यात आला.

ट्रम्प यांनी ४५वे अध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांच्याविरोधी हा मोर्चा काढण्यात आला होता. हा केवळ एका दिवसाचा मोर्चा असून मानवी अधिकारांचे संरक्षण करण्यासाठीची ही चळवळ आहे, असे महिलांचा मोर्चा आयोजित करणाऱ्या संयोजकांनी स्पष्ट केले.

नव्या राष्ट्राध्यक्षांच्या विभाजनवादी धोरणांमुळे या मोर्चात सहभागी झाल्याचे या वेळी अमेरिकी नागरिकांनी स्पष्ट केले. निवडून आलेले पाच भारतीयही या मोर्चात सहभागी झाले होते. वॉशिंग्टन येथेही आयोजित अशाच प्रकारच्या मोर्चात ५० हजार अमेरिकी नागरिक सहभागी झाले होते. वॉशिंग्टन येथे जमलेल्या जमावाने व्हाइट हाउसपर्यंत मोर्चा काढला.

प्रियंका चोप्राचा पाठिंबा

वॉशिंग्टन येथे आयोजित करण्यात आलेल्या डोनाल्ड ट्रम्पविरोधी मोर्चाला अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिने पाठिंबा दिला आहे. चित्रीकरणात व्यस्त असल्याने प्रियंका या मोर्चात सहभागी होऊ शकली नाही. मात्र, तिने ट्रम्प यांच्या धोरणांचा निषेध नोंदविला आहे. ट्विटरवरून प्रियंकाने मोर्चात सहभागी झालेल्या महिलांना प्रोत्साहन दिले.