सीआयएचा गोप्यस्फोट, ओबामा यांच्याकडून चौकशीचे आदेश

रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील विजयामागे रशियाचा हात असल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट ‘सीआयए’ या अमेरिकी गुप्तचर संघटनेने एका गोपनीय अहवालाद्वारे केला आहे. केवळ अमेरिकेच्या निवडणूक पद्धतीवरील नागरिकांचा विश्वास कमी व्हावा म्हणूनच नव्हे, तर २०१६च्या या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना मदत व्हावी यासाठी रशियाने हस्तक्षेप केला, असे या अहवालात ‘सीआयए’ने म्हटले आहे. मात्र नवनियुक्त अध्यक्ष ट्रम्प यांच्यातर्फे याचा स्पष्ट शब्दांत इन्कार करण्यात आला आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या सुप्रतिष्ठित दैनिकाने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे. ‘सीआयए’ने काही निवडक सिनेट सदस्यांना हा अहवाल दाखविला होता. सदर अधिकारी त्या गटाशी संबंधित असल्याचे या वृत्तात म्हटले आहे.

अध्यक्षीय निवडणुकीच्या काळात डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्या प्रचार मोहिमेच्या प्रमुखांसह पक्षाच्या राष्ट्रीय समितीचे ई-मेल खाते ‘हॅक’ करण्यात आले होते. त्यातील हजारो ई-मेल विकिलिक्स या संकेतस्थळास देण्यात आले. यामागे असलेली व्यक्ती रशियन सरकारशी संबंधित असल्याचे ‘सीआयए’च्या तपासात उघड झाले. ही व्यक्ती हेरगिरी व्यवसायातील आहे. या निवडणुकीत ट्रम्प यांच्या विजयाची शक्यता वाढावी आणि क्लिंटन यांचे नुकसान व्हावे यासाठी रशियाने एक व्यापक मोहीम आखली होती. ही व्यक्ती त्या मोहिमेचा एक भाग होती, असे ‘सीआयए’ने आपल्या अहवालात म्हटले आहे. यावरून ट्रम्प निवडून यावेत हे रशियाचे ध्येय होते हे स्पष्ट झाले आहे, असे सिनेट सदस्यांसमोर हा अहवाल सादर करताना ‘सीआयए’च्या अधिकाऱ्याने म्हटल्याचे वॉशिंग्टन पोस्टने नमूद केले आहे.

ट्रम्प यांनी हे आरोप पूर्णत: फेटाळून लावले आहे. ‘टाइम’ साप्ताहिकाशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, रशियाने हस्तक्षेप केला यावर आपला विश्वास नाही. हे काम रशियाचे असेल, चीनचे असले किंवा ते न्यू जर्सीतील आपल्या घरातूनही कोणी केले असेल. ट्रम्प यांनी यासंदर्भात प्रसृत केलेल्या निवेदनात ‘सीआयए’वरही टीका केली आहे. सद्दाम हुसेन यांच्याकडे महासंहारक अस्त्रे असल्याचा दावा करणारे ते हेच लोक आहेत, असे ते म्हणाले.

दरम्यान, या सर्व प्रकाराची र्सवकष चौकशी करण्याचे आदेश विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा यांनी दिले असून, त्याबाबतचा अहवाल २० जानेवारीपूर्वी सादर करावा, असेही त्यांनी बजावले असल्याचे ‘व्हाइट हाऊस’तर्फे सांगण्यात आले. २० जानेवारी हा ओबामा यांच्या अध्यक्षीय कारकीर्दीचा अखेरचा दिवस आहे.

अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प निवडून यावेत हे रशियाचे ध्येय होते. त्यासाठी या निवडणुकीत क्लिंटन यांचे नुकसान व्हावे याकरिता रशियाने हस्तक्षेप केला.  -‘सीआयएचा गोपनीय अहवाल