अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाउसमध्ये पहिली दिवाळी साजरी करताना भारतीय अमेरिकी लोकांच्या विविध क्षेत्रातील कामगिरीची प्रशंसा केली. विज्ञान, वैद्यक, उद्योग व शिक्षण क्षेत्रात भारतीय वंशाच्या लोकांनी मोठे योगदान दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भारतीय अमेरिकी सदस्य व संयुक्त राष्ट्रातील दूत निक्की हॅले, वैद्यकीय प्रशासक सीमा वर्मा, अमेरिकी संघराज्य संपर्क आयोगाचे अध्यक्ष अजित पै, मुख्य उपसचिव राज शहा यांच्यासमवेत ट्रम्प यांनी दिवाळी साजरी केली. दिवाळी साजरी करताना भारतीय लोकांची विशेष आठवण आल्याशिवाय राहत नाही. जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताचा नावलौकिक आहे, असे ट्रम्प यांनी ओव्हल कार्यालयात दिवाळी साजरी करताना सांगितले. त्याची चित्रफीत फेसबुकवर प्रसारित करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी यांच्याशी आपले अधिक चांगले व दृढ संबंध असल्याचे सांगून ते म्हणाले, की प्रशासनातील भारतीय वंशाच्या अधिकाऱ्यांसमवेत दिवाळी साजरी करताना आनंद वाटला. अध्यक्ष ट्रम्प यांच्या कन्या इव्हान्का या दिवाळी समारंभास उपस्थित होत्या, असे व्हाइट हाउसने प्रसारित केलेल्या छायाचित्रात दिसत आहे. अमेरिकेच्या प्रगतीत भारतीय वंशाच्या लोकांचे मोठे योगदान आहे. अमेरिकेच्या लष्करातही या लोकांनी मोठे काम केले आहे. व्हाइट हाउसमध्ये दिवाळी साजरी करताना आम्हाला अभिमान वाटतो. भारतीय अमेरिकी व हिंदू-अमेरिकी लोक हे अमेरिकी कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग आहेत, दिवाळी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. शांतता व भरभराटीचे प्रतीक असलेली दिवाळी जगातील १ अब्ज हिंदू व अमेरिकेतील वीस लाख हिंदू मोठय़ा उत्साहात साजरी करतात. बौद्ध, शीख व जैन लोकही भारत व जगात दिवाळी साजरी करतात, असे त्यांनी सांगितले.

सोहळ्याचा इतिहास

व्हाइट हाउसमध्ये दिवाळी साजरी करण्याची परंपरा अध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या काळात सुरू झाली. त्यांच्या काळात इंडिया ट्रीटी रूममध्ये ती साजरी होत असे. कार्यकारी इमारतीच्या शेजारी हे ठिकाण असून तो व्हाइट हाउस संकुलाचा भाग आहे. असे असले तरी बुश कधीही व्यक्तिश: दिवाळी समारंभात सहभागी झाले नाहीत. माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी अध्यक्षीय काळाच्या पहिल्याच वर्षी व्हाइट हाउसच्या इस्ट रूममध्ये दीपप्रज्वलन केले होते. गेल्या वर्षी ओबामा हे ओव्हल कार्यालयातील दिवाळी समारंभास उपस्थित होते.