खासगी सव्‍‌र्हरवरून महत्त्वाचे कार्यालयीन इमेल पाठवल्याच्या प्रकरणी माजी परराष्ट्रमंत्री व डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षीय शर्यतीतील उमेदवार हिलरी क्लिंटन या आतापर्यंत तुरुंगात असायला हव्या होत्या अशी घणाघाती टीका रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षीय शर्यतीतील उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. ते म्हणाले की, हिलरी क्लिंटन या कमकुवत आहेत, चोर आहेत. राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणल्याबाबत त्या इमेल प्रकरणी तुरुंगात असायला हव्या होत्या. कॅलिफोर्निया येथे निवडणूक प्रचार सभेत ट्रम्प बोलत होते. त्यांनी सांगितले की, मंगळवारी पुन्हा प्राथमिक लढती सुरू होत आहेत. ट्रम्प यांना अध्यक्षीय उमेदवारीसाठी हवी होती तेवढी मते मिळाली आहेत. क्लिंटन यांना मात्र व्हेरमाँटचे सिनेटर बर्नी सँडर्स यांचे कडवे आव्हान आहे. गेल्या काही दिवसांत क्लिंटन व ट्रम्प यांच्यातील शाब्दिक युद्ध टोकाला गेले आहे. क्लिंटन यांनी कॅलिफोर्नियात ट्रम्प यांची तुलना हुकूमशहाशी केली. आपल्याला अध्यक्ष निवडायचा आहे, हुकूमशहा नाही. डोनाल्ड ट्रम्प केवळ स्थलांतरितांना बदनाम करण्याच्या मुद्दय़ावर प्रचार करीत आहेत, तो केवळ राजकीय स्टंट आहे. ते स्वत:कडे लक्ष वेधून घेतात, वृत्तपत्रात व दूरचित्रवाणीवर नाव वाजतेगाजते राहिले पाहिजे एवढेच ते बघतात, अध्यक्षपदासाठी हे पुरेसे नाही.
ट्रम्प यांनी कॅलिफोर्नियात सांगितले की, मी कॅलिफोर्नियातजिंकणारच, खरे तर तो डेमोक्रॅटिकचा बालेकिल्ला आहे. हिलरी क्लिंटन या कमकुवत उमेदवार आहेत. आम्ही काही हरण्यासाठी आलेलो नाही. हिलरी क्लिंटन कमकुवत आहे त्यामुळे आम्ही जिंकणार आहोत. त्यांनी त्यांच्या कारकीर्दीत इमेलचे जे प्रकरण केले ते भयानकच होते. व्यक्तिगत इमेल त्यांनी खासगी सव्‍‌र्हरवर पाठवले त्यातून राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आली. त्यावेळी त्या परराष्ट्र मंत्री होत्या. त्यांनी सगळी गुपिते अँथनी वेनर यांच्या पत्नी हुमा अबेदीन यांच्याकडे इमेलच्या माध्यमातून फोडली.