अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडून आल्यास जागतिक व्यापार संघटनेतून अमेरिका बाहेर पडेल, असे संकेत दिले आहेत.

न्यूयॉर्क येथील अब्जाधीश असलेले रिपब्लिकन उमेदवार ट्रम्प यांनी एनबीसी टीव्हीला ‘मीट द प्रेस’ कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत सांगितले, की आम्ही उत्तर अमेरिका मुक्त व्यापार करारावर फेरवाटाघाटी करूच, पण जागतिक व्यापार संघटनेतून बाहेर पडू. नाटोच्या भूमिकेवरही त्यांनी यापूर्वीच प्रश्नचिन्ह लावले आहे. उत्पादन प्रक्रिया परदेशात नेणाऱ्या कंपन्यांवर ३० टक्के कर लावला जाईल असे सांगून त्यांनी नाफ्ताचा भागीदार असलेल्या मेक्सिकोचे उदाहरण दिले आहे.   मुलाखतकार चक टॉड यांनी ट्रम्प यांना असा प्रतिप्रश्न केला, की अमेरिकेने जागतिक व्यापार संघटनेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तर त्याला विरोध होईल असे वाटत नाही का? त्यावर ट्रम्प म्हणाले, की मला त्याने काही फरक पडत नाही. आम्ही फेरवाटाघाटी करून बाहेर पडू. हे व्यापार करार धोकादायक आहे. जागतिक व्यापार संघटना हा एक फार्स आहे.