अमेरिकी प्रतिनिधिगृहाचे अध्यक्ष पॉल रायन यांनी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षीय शर्यतीतील उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा देण्यास तूर्त नकार दिला आहे. प्रत्यक्ष अध्यक्षीय उमेदवारीच्या प्राथमिक लढतींमध्ये ट्रम्प हे विजयी झाल्यात जमा आहेत तरी त्यांना पक्षामध्ये समर्थन मिळवावे लागणार आहे. त्यांच्या पाठीशी पक्ष भक्कमपणे उभा राहिला नाही तर त्यांचे अध्यक्षीय निवडणुकीतील भवितव्य चांगले असणार नाही त्यामुळे रायन यांनी दिलेला नकार महत्त्वाचा आहे. सध्यातरी ट्रम्प यांना पाठिंबा देण्याची माझी तयारी नाही असे रायन यांनी सीएनएनला सांगितले.

त्यांच्या या खळबळजनक वक्तव्याने ट्रम्प यांच्या अध्यक्षीय महत्त्वाकांक्षांना लगाम बसण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांच्या उमेदवारीबाबत रिपब्लिकन पक्षातील मतभेद दूर करणे आवश्यक आहे. रायन यांनी सांगितले की, पक्षाला संघटित करण्याचे काम आता ट्रम्प यांनी करणे अपेक्षित आहे. इंडियानातील प्राथमिक लढतीनंतर टेड क्रूझ व जॉन कसिच यांनी रिपब्लिकन अध्यक्षीय लढतीतून माघार घेतली असून ट्रम्प यांना अध्यक्षपदाची उमेदवारी मिळाल्यात जमा आहे.

हा लिंकन, रेगन व जॅक केम्प यांचा पक्ष आहे, दर चार वर्षांनी आम्ही लिंकन किंवा रेगन यांच्यासारखे उमेदवार देऊ शकत नाही पण उमेदवाराने लिंकन, रेगन यांच्यासारखे काम करून दाखवण्याची इच्छा तरी प्रदर्शित केली पाहिजे असे सांगून ते म्हणाले की, आमच्या पक्षाची तत्त्वे व बहुसंख्य अमेरिकी लोकांची मते उमेदवाराने लक्षात घेतली पाहिजेत. दरम्यान ट्रम्प यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले आहे की, रायन यांच्या भूमिकेला माझा अजिबात पाठिंबा नाही, कदाचित भविष्यात आम्ही अमेरिकी लोकांच्या भल्यासाठी एकत्र काम करू. पक्षाने अमेरिकी लोकांना वाईट वागवले आहे आता मी अमेरिकी लोकांना अग्रस्थानी ठेवले आहे. रायन व ट्रम्प यांच्यातील मतभेद टोकाला गेले असून त्यांच्यात तात्त्विक  व इतरही मतभेद आहेत. रायन हे खुला व्यापार, आंतरराष्ट्रीय लष्करी सहकार्य, सामाजिक सुरक्षा व वैद्यकीय सुधारण यांचे समर्थक आहेत तर ट्रम्प हे खुला व्यापार, परदेशी हस्तक्षेप, सामाजिक सुरक्षा योजना या विरोधात आहेत.