अमेरिकेतील प्रसिद्ध मासिक ‘टाइम’तर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या ‘पर्सन ऑफ द इयर’ पुरस्कारासाठी यंदा अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची निवड करण्यात आली आहे. टाइम मासिकाच्या मुखपृष्ठावर माझा फोटो येणे ही माझ्यासाठी गौरवास्पद बाब असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले.

टाइम मासिकातर्फे दरवर्षी एक व्यक्ती किंवा संस्थेची पर्सन ऑफ द इयर म्हणून निवड केली जाते. जगाला प्रभावित करणाऱ्या अथवा माध्यमांमध्ये प्रभाव निर्माण करणाऱ्यांना  ‘टाइम’तर्फे ‘पर्सन ऑफ द इयर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदा पर्सन ऑफ द इयरच्या स्पर्धेत डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर हिलरी क्लिंटन, रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतीन, फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग यांचे आव्हान होते. या सर्वांना पिछाडीवर टाकत डोनाल्ड ट्रम्प यांनी टाइम पर्सन ऑफ द इयरचा पुरस्कार पटकावला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प हे १० वेळा टाइम मासिकाच्या मुखपृष्ठावर आले आहेत. १९८९ मध्ये ते पहिल्यांदा मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकले होते. ‘टाइम पर्सन ऑफ द इयर’मध्ये हिलरी क्लिंटन या दुस-या स्थानी आहेत. तर द हॅकर हा ग्रुप तिस-या स्थानी आहे. गेल्या वर्षी जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांची टाइम पर्सन ऑफ द इयर पुरस्कारासाठी निवड झाली होती.

अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे २००८ आणि २०१२ मध्ये टाइम पर्सन ऑफ द इयर ठरले होते. या दोन्ही वर्षी ते निवडणुकीत विजयी झाले होते. तर जॉ़र्ज बुशदेखील २००४ आणि २००८ या वर्षी पर्सन ऑफ द इयर ठरले होते. १९३२ मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट यांच्यानंतर प्रत्येक अमेरिकी  राष्ट्राध्यक्ष हे टाइमच्या पर्सन ऑफ द इयरच्या स्पर्धेत असतात.

टाइमच्या पर्सन ऑफ द इयर या पुरस्कारासाठी होणाऱ्या ऑनलाइन मतदानात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आघाडी घेतली होती. अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि विविध क्षेत्रांतील दिग्गजांना त्यांनी मागे टाकले होते.