अमेरिकेचे नूतन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दक्षिण आशियात त्यांचा चांगला मित्र कोण आहे, याची कल्पना आहे. त्यांचे प्रशासनही दक्षिण आशियात शांती आणि समृद्धीसाठी प्रयत्न करेल, असा आशावाद भारतीय वंशाचे अमेरिकन उद्योगपती शलभ कुमार यांनी व्यक्त केला आहे. नव्या सरकारच्या सत्ताग्रहण समारोहासाठी बनवलेल्या समितीत शलभ कुमार यांचा समावेश करण्यात आला आहे. ट्रम्प यांनी अमेरिका आणि भारत जवळचे मित्र असतील असे म्हटले आहे. ट्रम्प यांना हिंदू धर्म आणि भारतीय लोक खूप आवडतात. विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मादी त्यांना खूप आवडतात, अशी माहितीही कुमार यांनी दिली. भारत पाकिस्तानबरोबर सलोख्याचे संबंध निर्माण करू इच्छितो याची माहिती ट्रम्प यांना असल्याचे कुमार यांनी सांगितले. कुमार अमेरिकेतील रिपब्लिकन हिंदू आघाडीचे अध्यक्ष आहेत.

निवडणुकीच्या १५ दिवस आधी हिंदू-अमेरिकन नागरिकांच्या एका कार्यक्रमात ट्रम्प यांना बोलावण्यात कुमार यांनी महत्वाची भूमिका निभावली होती. ट्रम्प यांच्या मते पाकिस्तानच्या बहुतांश लोकांनाही शेजारील देशाबरोबर सलोख्याचे संबंध निर्माण करायचे आहेत. परंतु इस्लामी दहशतवादाचा खात्मा करणेही महत्वाचे असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटल्याचे त्यांनी सांगितले.
कुमार यांच्या मते ट्रम्प हे पाकिस्तानचे लोक आणि पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याबाबतीत सहकार्याचे निवेदन देतील. कुमार आणि त्यांच्या परिवाराने १.१ मिलियन डॉलरची देणगी ट्रम्प यांच्या निवडणूक मोहिमेसाठी दिले होते. ट्रम्प यांच्या निवडणुकीसाठी आलेल्या देणगीत सर्वाधिक देणगीदारांच्या यादीत कुमार यांचा पहिल्या १० लोकांमध्ये समावेश होता.