पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याशी अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेले संभाषण हे भारताला चुकीचा संदेश देणारे आहे व ट्रम्प यांचे संभाषण फारच अज्ञानमूलक होते असे फोर्ब्स नियतकालिकाने म्हटले आहे.

ट्रम्प यांनी जे अघळपघळ संभाषण केले आहे त्यावरून त्यांना अमेरिका, पाकिस्तान व भारत यांच्यातील संबंधाची काही माहिती नाही असाच संदेश गेला आहे. त्यांचे हे संभाषण त्यांच्या प्रशासनाची प्राथमिक भूमिका म्हणून गणले जात आहे, त्यात त्यांनी पाकिस्तानचे वर्णन करताना त्या देशाचे काम छान आहे, लोकही चांगले आहेत, त्या देशाची प्रतिमाही चांगली आहे असे गोडवे गाणारे वर्णन केले होते. त्यांच्या या संभाषणातून त्यांना अमेरिका-पाकिस्तान व भारत यांच्यातील प्रश्नांचे किंवा मुद्दय़ांचे ज्ञान नाही हेच दिसून आले. ट्रम्प यांना दक्षिण आशियातील वास्तव माहीत नाही. त्यांच्या या संभाषणातून भारताला चुकीचा संदेश गेला आहे. दरम्यान, ट्रम्प यांच्या या पाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या वक्तव्यानंतर हिंदू अमेरिकन फाऊंडेशनचे कार्यकारी संचालक सुहाग शुक्ला यांनी म्हटले आहे, की नवनिर्वाचित अध्यक्षांनी पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी व मानवी हक्क संरक्षणाबाबतच्या कृतींचा आढावा घ्यावा. पाकिस्तानशी व्यवहार करताना राजनैतिकता महत्त्वाची आहे हे खरे असले तरी ट्रम्प व त्यांच्या प्रशासनाने पाकिस्तानची दुतोंडी भूमिका पाहता सावध असले पाहिजे. जर या संभाषणाचा पाकिस्तानने दिलेला तपशील खरा असेल तर ट्रम्प यांनी त्या पाकिस्तानचे शेजारी देशाशी असलेले वागणे व दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी केलेली कामगिरी तपासून पाहायला हवी.

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत-पाकिस्तान यांच्यातील काश्मीरच्या मुद्दय़ात सहभागी होतील असे वाटत नाही. त्यांनी दक्षिण आशियातील घडामोडीत स्वारस्य दाखवले असले तरी ते काश्मीर प्रश्नात लक्ष घालतील असे वाटत नाही, असे मत द हेरिटेज फाऊंडेशनच्या लिसा कर्टिस यांनी ‘द डेली सिग्नल’ या वृत्तपत्रात व्यक्त केले आहे. त्या म्हणातात, की ट्रम्प प्रशासन काश्मीर मुद्दय़ात अमेरिकेला सहभागी करील असे वाटत नाही, कारण दक्षिण आशियातील एक महत्त्वाचा देश असलेल्या भारताशीही त्यांना चांगले संबंध हवे आहेत. या प्रश्नात अगदीच भूमिका पार पाडायची तर ट्रम्प प्रशासन पाकिस्तानला दहशतवाद विरोधी कारवाई अधिक जोरकसपणे करण्यात यावी असे सांगू शकते. उरी येथील हल्ला पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधण्यासाठीच केला होता असेही त्यांनी म्हटले आहे.