अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘सीपॅक’ परिषदेत प्रसारमाध्यमांवर हल्ला

‘‘खोटय़ा बातम्या याच नागरिकांच्या खऱ्या शत्रू आहेत. खोटारडी माध्यमे जनतेचे योग्य प्रतिनिधित्व करत नाहीत. मी प्रसारमाध्यमांच्या पूर्णपणे विरोधात नाही; पण असत्यावर आधारित बातम्या पसरवणाऱ्या माध्यमांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल,’’ अशा शब्दांत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील उजव्या आणि परंपरावाद्यांच्या ‘सीपॅक’ (कॉन्झव्‍‌र्हेटिव्ह पॉलिटिकल अ‍ॅक्शन कॉन्फरन्स) या परिषदेत प्रसारमाध्यमांवर पुन्हा आगपाखड केली.

‘अमेरिकन कॉन्झव्‍‌र्हेटिव्ह युनियन’ आणि अन्य संस्थांतर्फे १९७३ पासून ‘सीपॅक’ या परिषदेचे आयोजन करण्यात येते. अमेरिकेतील उजव्या आणि रूढीवादी विचारवंतांचे ते एक महत्त्वाचे विचारकेंद्र मानण्यात येते. त्यामध्ये ट्रम्प यांनी एक उद्योगपती म्हणून २०११ साली भाषण केले होते. त्यानंतर यंदा ट्रम्प यांनी अध्यक्ष म्हणून या सभेला संबोधित केले.

आपल्या भाषणात ट्रम्प यांनी अमेरिकेला अधिक चांगले, सशक्त आणि महान करण्याच्या घोषणेचा पुनरुच्चार केला. आपल्या प्रशासनाचे विपर्यस्त चित्र उभे करत असल्याबद्दल माध्यमांवर टीका केली. तसेच ‘सीएनएन’ (केबल न्यूज नेटवर्क) ही वाहिनी त्यांच्या निवडणुकीतील प्रतिस्पर्धी हिलरी क्लिंटन यांना धार्जिणी असल्याचा आरोप करत तिचा ‘क्लिंटन न्यूज नेटवर्क’ असा उपहासगर्भ उल्लेख ट्रम्प यांनी केला.

अमेरिकेला पुन्हा एक बलाढय़ लष्करी शक्ती बनवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. तसेच इस्लामिक स्टेट (आयसिस) या दहशतवादी संघटनेचा पुरता बीमोड करण्यासाठी अमेरिकी लष्कराने कंबर कसली असल्याचे सांगितले. शेजारील मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्याचे काम अपेक्षित वेळेपूर्वी सुरू केले जाईल, असेही ट्रम्प यांनी सांगितले. यापूर्वीच्या बराक ओबामा प्रशासनाने घालून ठेवलेला घोळ आपल्याला निस्तरावा लागत असल्याचे पालुपद त्यांनी पुन्हा एकदा लावले. देशांतर्गत सामाजिक, आर्थिक, औद्योगिक परिस्थिती बिघडली आहे. मध्यपूर्वेतील स्थिती कधी नव्हे इतकी चिघळली आहे, असा आरोपही ट्रम्प यांनी केला.

व्हिसा र्निबधाविरोधात भारताचे अमेरिकेकडे लॉबिंग

नवी दिल्ली : एच१बी व्हिसावर र्निबध घालण्याच्या अमेरिकेतील काँग्रेसच्या हालचालींविरोधात भारताने अमेरिकेच्या प्रशासनाकडे लॉबिंग करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. अशा प्रकारच्या र्निबधांमुळे दक्षिण आशियाई देशातील तंत्रज्ञान क्षेत्राला धोका निर्माण होणार आहे. या क्षेत्रांत ३.५ दशलक्ष रोजगार आह. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाकडे भारताने संपर्क साधला असून अमेरिकेच्या नागरिकांसाठी भारताच्या १५० अब्ज डॉलरच्या माहिती-तंत्रज्ञान सेवेचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नासकॉमचे शिष्टमंडळ सध्या अमेरिकेत असून ते व्हाइट हाऊसकडे हा प्रश्न उपस्थित करणार आहेत. भारताने अमेरिकेत केलेल्या गुंतवणुकीमुळे अमेरिकेच्या नागरिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे, हे अमेरिकेच्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात येणार आहे. कुशल कामगारांचा खुल्या मनाने विचार करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेला सांगितले होते. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिका प्रथम रोजगार धोरणामुळे टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस, विप्रो आदींना धोका निर्माण होण्याची लक्षणे दिसत आहेत.

निवडणुकीत दिलेल्या वचनांच्या  पूर्तीसाठी ट्रम्प झपाटल्यासारखे कामाला लागले आहेत, असे मत अमेरिकी अध्यक्षांचे मुख्य धोरणकर्ते स्टीव्ह बॅनन  यांनी व्यक्त केले आहे. सध्या त्यांच्या यासंबंधी आदेशांची जोरदार अंमलबजावणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.