पस्तीस जणांना अटक
अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून जवळपास निवड निश्चित झालेले डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक व विरोधक यांच्यात सॅनदिएगो येथील प्रचारसभेच्या वेळी जोरदार धुमश्चक्री झाली. त्यात पस्तीस जणांना अटक करण्यात आली आहे.गेल्या तीन दिवसातील ही दुसरी चकमक असून त्यामुळे ट्रम्प यांच्या प्रचारावर परिणाम झाला आहे. ट्रम्प समर्थक व विरोधक एकमेकांवर ओरडत धावून गेले, त्यांनी पाण्याच्या बाटल्या फेकल्या. पोलिसांनी त्यांना नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला. पश्चिम कॅलिफोर्नियात सॅनडियागो येथे रिपब्लिकन नेते ट्रम्प यांचे भाषण संपल्यानंतर अनेक लोकांनी प्लास्टिकच्या बाटल्या व दगड भिरकावले. पोलिसांनी जमावावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. हजार लोकांचा जमाव होता, त्यात निदर्शक व समर्थक यांच्यात तुंबळ हाणामाऱ्या झाल्या. काहींनी मेक्सिकोचे ध्वज व ट्रम्पविरोधी चिन्हे फडकावली. काही निदर्शकांनी अडथळे ओलांडण्याचा प्रयत्न केला. यात पस्तीस जणांना अटक करण्यात आली आहे. मालमत्तेचे कुठलेही नुकसान झाले नाही. जमाव नियंत्रणाबाहेर गेला होता, त्यामुळे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले, असे सॅनडियागो पोलिसांनी सांगितले. ट्रम्प यांनी पोलिसांनी निदर्शकांना ज्या पद्धतीने हाताळले त्यावर समाधान व्यक्त केले. जे देश अमेरिकेचे व्यापारी भागीदार आहेत त्यांच्यावर ट्रम्प यांच्या वक्तव्यांनी वाईट परिणाम होत आहे, अशी टीका ओबामा यांनी केली होती. त्यावर मी चांगला माणूस आहे, महान आहे, त्या देशांच्या दृष्टीनेही आपण महान बनण्याचा प्रयत्न करू. या वेळी ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ असे लिहिलेली टोपी एकाकडून हिसकावून जाळण्यात आली. मंगळवारी न्यू मेक्सिको येथे झालेल्या सभेतही असाच गोंधळ झाला होता, त्या वेळी अडथळे पाडण्यात आले. टी शर्ट जाळून, पोलिसांवर प्लास्टिकच्या बाटल्या फेकण्यात आल्या होत्या.