मलाला युसुफझाईचे मत
मुस्लिमांना अमेरिकेत प्रवेशबंदी करावी हे रिपब्लिकन प्रतिनिधी डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान तिरस्काराने भरलेले आहे, असे मत नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफझाई हिने व्यक्त केले आहे.
दहशतवादाबद्दल मुस्लिमांना दुषणे दिल्याने केवळ दहशतवादाला अधिक खतपाणी घातले जाईल. त्यामुळे ट्रम्प यांचे तिरस्कारपूर्ण विधान ऐकणे हीच शोकांतिका आहे, अन्य लोकांबद्दल सापत्नभावाची भूमिका व्यक्त करणारे आहे, असे मलाला हिने ब्रिटिश माध्यमांना सांगितले.
राजकीय नेते आणि माध्यमे यांनी वक्तव्य करताना अधिक काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दहशतवादाला पायबंद घालावयाचा हा तुमचा हेतू असेल तर त्यासाठी संपूर्ण मुस्लीम समाजाला दुषणे देण्याचा प्रयत्न करू नये, कारण त्यामुळे दहशतवाद थांबणार नाही, त्यामुळे दहशतवादाचा अधिक धोका निर्माण होईल, असेही मलालाने म्हटले आहे.
पाकिस्तानात पेशावरमध्ये लष्करी शाळेवर तालिबान्यांनी केलेल्या हल्ल्यास एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बर्मिगहॅम येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात मलाला बोलत होती.