अमेरिकेचे मावळते अध्यक्ष बराक ओबामा २० जानेवारीला अध्यक्षपदाचा कार्यभार नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे सोपवणार आहेत. अमेरिकेचे आतापर्यंतचे सर्वात प्रसिध्द राष्ट्राध्यक्ष आता महासत्तेची सूत्रं डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे सोपवणार आहेत.

कधी आहे शपथविधी?

२० जानेवारीला डोनाल्ड ट्रंप यांचा शपथविधी वाॅशिंग्टनमध्ये होणार आहे. या शपथविधी सोहळ्याआधीच्या कार्यक्रमांना भारतीय प्रमाणवेळेनुसार १९ जानेवारीच्या रात्रीच सुरूवात होणार आहे. प्रत्यक्ष शपथविधी सोहळा शुक्रवार २० जानेवारीला रात्री १० वाजल्यानंतर सुरू होईल.

कोण देणार शपथ?

अमेरिकन सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश म्हणजेच चीफ जस्टिस नव्या अमेरिकन अध्यक्षांना शपथ देतात. यावेळी चीफ जस्टिस जाॅन राॅबर्ट्स अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्र्म्पना शपथ देतील.

कुठे दिली जाते शपथ?

वाॅशिंग्टनच्या कॅपिटाॅल हिल बिल्डिंगच्या पायऱ्यांवर नव्या अध्यक्षांना शपथ दिली जाते. कॅपिटाॅल बिल्डिंग म्हणजे अमेरिकेचं संसदभवन

शपथ काय असते?

अमेरिकेच्या प्रत्येक नव्या अध्यक्षाला ही शपथ घ्यावी लागते

“मी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी श्रध्दापूर्वक पार पाडेन आणि माझ्या क्षमतेच्या अंतापर्यंत अमेरिकेच्या संविधानाचं रक्षण करेन”

सोहळ्याला कोण कोण उपस्थित राहणार?

नव्या अध्यक्षांच्या शपथविधीसाठी विद्यमान अध्यक्षांना उपस्थित राहणं बंधनकारक नसतं. पण आधीचे राष्ट्राध्यक्ष नेहमीच उपस्थित राहतात. यावेळच्या सोहळ्याला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि ट्रम्प यांच्याविरूध्द यंदा निवडणूक लढलेल्या हिली क्लिंटन उपस्थित असतील. तसंच माजी राष्ट्राध्यक्ष जाॅर्ज बुश आणि त्यांच्या पत्नी लाॅरा उपस्थित राहतील. अमेरिकेचे आणखी एक माजी अध्यक्ष जिमी कार्टर या सोहळ्याला उपस्थित असतील. जाॅर्ज बुश सीनियर यांची प्रकृती बिघडल्याने ते या सोहळ्यामध्ये नसतील.

कुठल्या भारतीय चेहऱ्यांची उपस्थिती? 

संयुक्त राष्ट्रांमध्ये अमेरिकेच्या प्रतिनिधी म्हणून नेमणूक झालेल्या भारतीय वंशाच्या अमेरिकन राजकारणी निकी हेली या सोहळ्यात असतील. तसंच ट्रम्प यांना निवडणुकीदरम्यान मोठी आर्थिक तसंच इतर मदत करणारे शलभ कुमार यांच्यासारखे भारतीय वंशाचे उद्योजकही या सोहळ्याला असण्याची शक्यता आहे. तसंच भारताचे अमेरिकेतले राजदूत नवतेज सरना या सोहळयादरम्यान उपस्थित राहणार आहेत

डोनाल्ड ट्रम्प कितवे राष्ट्राध्यक्ष?

डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे ४५वे अध्यक्ष असतील.

शपथविधी सोहळा कसा पहायचा?

व्हाईट हाऊसच्या अधिकृत वेबसाईटवर या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण पाहता येईल. indianexpress.com वरही शपथविधी सोहळ्याचं थेट प्रक्षेपण तुम्ही पाहू शकता. याशिवाय सीएनएन, बीबीसी यांसारख्या आंतरराष्ट्रीय न्यूज चॅनल्सवर हा सोहळा दाखवला जाईल. त्यांच्या वेबसाईट्सवरही याचं कव्हरेज असेल. तसंच यावेळच्या शपथविधीबद्दल प्रेक्षकांमध्ये असलेली उत्सुकता पाहता अनेक आॅनलाईन स्ट्रीमिंग सर्व्हिसेसही हा सोहळा दाखवण्याची शक्यता आहे.

 

शपथविधी सोहळ्याचा संपूर्ण कार्यक्रम पुढीलप्रमाणे (भारतीय प्रमाणवेळेनुसार):

गुरूवार १९ जानेवारी :-
रात्री ९ वाजता

वाॅशिंग्टनच्या लिंकन मेमेरियलमध्ये संगीताचे दोन कार्यक्रम होतील. ‘व्हाॅईसेस आॅफ द पीपल’ आणि ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन: वेलकम सेलेब्रेशन’ असे हे दोन कार्यक्रम असतील. दुसऱ्या कार्यक्रमाला डोनाल्ड ट्रम्प हजेरी लावतील. ते छोटंसं भाषणही करण्याची शक्यता आहे.
शुक्रवार २० जानेवारी:-
पहाटे २ वाजता

डोनाल्ड ट्रम्प आणि भावी उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स आर्लिंग्टन इथल्या लष्करी स्मारकाला भेट देत पुष्पचक्र वाहतील. दिल्लीच्या अमर जवान स्मारकाप्रमाणे हे स्मारक अमेरिकेसाठी प्राण दिलेल्या सैनिकांना समर्पित आहे.

शुक्रवार २० जानेवारी सकाळी ६ वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
ट्रम्प यांना निवडणुकीदरम्यान निधी उभारायला मदत केलेल्यांसाठी डिनर. शुक्रवारी सकाळी डोनाल्ड ट्र्म्प व्हाईट हाऊसच्या गेस्टहाऊसमध्ये म्हणजेच ब्लेअर हाऊसमध्ये नाश्ता करतील

भारतीय प्रमाणवेळेनुसार शुक्रवारी रात्री ८ वाजता डोनाल्ड ट्रम्प बराक ओबामा यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये काॅफी घेतील. त्यानंतर ते ओबामा यांच्यासोबत त्यांच्या अध्यक्षीय कारमधून कॅपिटाॅल हिलवर येतील. अध्यक्षपदाचा शपथविधी कॅपिटाॅल हिलवरच होणार आहे.

शुक्रवार २० जानेवारी रात्री ९ ते १० (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या अध्यपदाची शपथ घेतील. माईक पेन्स उपराष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतील. यानंतर काही औपचारिक कार्यक्रम होतील. यानंतर डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून पहिल्यांदा भाषण करतील

शनिवार २१ जानेवारी पहाटे १.३० वाजता
डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली अध्यक्षीय परेड निघेल. त्यांच्यासोबत त्यांचं कुटुंबही असेल. उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स आणि त्यांच्या कुटुंबालाही या परेडमध्ये मानाचं स्थान असेल.

शनिवार २१ जानेवारी पहाटे ५ वाजता

अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष यावेळी होणाऱ्या एका समारंभात एकत्र नृत्य करतील. अत्यंत देखण्या अशा या सोहळ्याची परंपरा फार जुनी आहे.