अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व प्रसारमाध्यमे यांच्यातील वाद टोकाला गेले असतानाच आता व्हाइट हाऊस कॉरस्पाँडंट असोसिएशनने आयोजित केलेल्या वार्षिक मेजवानी कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचा निर्णय ट्रम्प यांनी जाहीर केला आहे. असे करणारे ते गेल्या दशकभरातील   पहिलेच अमेरिकी अध्यक्ष आहेत.

ट्रम्प यांनी सांगितले, की व्हाइट हाऊस कॉरस्पाँडंट असोसिएशनच्या वार्षिक मेजवानी कार्यक्रमाला मी उपस्थित राहणार नाही. दरवर्षी ब्लॅक टाय डिनर नावाचा हा कार्यक्रम होत असतो, त्याला पत्रकार, अध्यक्ष, सेलेब्रिटीज, वॉशिंग्टनमधील प्रतिष्ठित लोक उपस्थित राहतात, त्यातून जो पैसा जमतो तो पत्रकारितेतील शिष्यवृत्त्यांसाठी वापरला जातो.

यापूर्वी १९८१ मध्ये हत्येच्या प्रयत्नातून वाचले असतानाच्या काळात रोनाल्ड रीगन हे या मेजवानी कार्यक्रमापासून दूर राहिले होते, पण त्यांनी फोनवरून त्या कार्यक्रमात भाषण प्रसारित केले होते. नॅशनल पब्लिक रेडिओच्या मते रिचर्ड निक्सन यांनी १९७२ मध्ये सरसकट या कार्यक्रमास जाण्याचे टाळले होते. व्हाइट हाऊसने न्यूयॉर्क टाइम्स, सीएनएन, बीबीसी यांना ऑफ कॅमेरा प्रेस ब्रीफिंगला उपस्थित राहण्यावर बंदी घातली. त्यानंतर आता ट्रम्प यांनी मेजवानीस उपस्थित न राहण्याचे ठरवले आहे.

  • नकारात्मक व खोटय़ा बातम्या प्रसारमाध्यमे देत असतात व प्रसारमाध्यमे विरोधी पक्षांसारखे काम करीत आहेत. अनेक वृत्तपत्रे, वाहिन्या व वृत्तसंस्था या अमेरिकी जनतेच्या शत्रू आहेत असे त्यांनी कॉन्झर्वेटिव्ह पॉलिटिकल अ‍ॅक्शन कॉन्फरन्सच्या कार्यक्रमात शुक्रवारी सांगितले होते.
  • व्हाइट हाऊसमधील पत्रकार आयोजित करीत असलेला मेजवानीचा कार्यक्रम वॉशिंग्टनमध्ये प्रथम १९२०मध्ये झाला होता. या वर्षी २९ एप्रिलला हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
  • ट्रम्प यांच्या निर्णयावर व्हाइट हाऊस कॉरस्पाँडंट असोसिएशनचे अध्यक्ष जेफ मॅसन यांनी सांगितले, की आम्ही याची नोंद घेतली आहे. ‘फर्स्ट अमेंडमेंट’ साजरी करण्यासाठी हा कार्यक्रम होत असतो तो होत राहील. अमेरिकेच्या प्रजासत्ताक वाटचालीत निष्पक्ष वृत्त माध्यमांनी मोठी भूमिका पार पाडली आहे.