आपला कारभार देशाबाहेर घेऊन जाणाऱ्या कंपन्यांना अमेरिकेचे नूतन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिला आहे. ज्या कंपन्या असा प्रयत्न करतील त्यांना त्याचे परिणामही भोगावे लागतील असे त्यांनी म्हटले आहे. एसी बनवणाऱ्या कॅरिअर या कंपनीने इंडियाना पोलिस येथील प्लांट बंद करून तो मेक्सिकोमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला होता. कॅरिअरच्या या निर्णयामुळे सुमारे ११०० लोकांच्या नोकऱ्यांवर गंडांतर आले होते. परंतु त्यांना कर सवलत दिल्यानंतर कंपनीने हा निर्णय मागे घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी हा इशारा दिला असल्याचे बोलले जाते.
आपले प्रशासन कॉर्पोरेट कर कमी करण्याबाबत विचार करत आहे. यामुळे अनेक कंपन्या अमेरिकेत राहण्याचा निर्णय घेतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. परंतु, ज्या कंपन्या आपले कामकाज बाहेर देशातून चालवतील त्यांना मोठा कर द्यावा लागेल असेही त्यांनी स्पष्ट केले. या कंपन्या दंड न भरता अमेरिका सोडू शकणार नाहीत. कॅरिअर प्रकरणाचे वृत्त वाहिन्यांवर दाखवण्यात आल्यानंतर त्याची दखल घेण्यात आली. हे वृत्त पाहिल्यानंतर आपल्याला निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची आठवण झाल्याचे ते म्हणाले.

आपण इतर कंपन्यांसोबतही वैयक्तिकरित्या चर्चा करणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. या वेळी त्यांनी टीकाकारांवरही भाष्य केले. मला वाटतं हे राष्ट्राध्यक्षाचे काम आहे. जर असे नसेल तरीही काही विशेष नाही. कारण वास्तवात असे करणेच मला योग्य वाटते. यासाठी देशाबाहेर जाणाऱ्या अनेक कंपन्यांशी मला बोलावे लागेल, असे ते म्हणाले.
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ट्रम्प यांनी दुसऱ्या देशांकडून काम करून घेणाऱ्या अमेरिकी कंपन्यांवर निशाणा साधला होता. त्यांच्या अशा वक्तव्यांना जनतेकडूनही मोठे समर्थन मिळाले होते. त्यावेळी त्यांनी फोर्ड मोटर व आणखी एका औषध कंपनीवर टीकाही केली होती. त्याचबरोबर आपण ओरियो कुकीज खाणार नसून या कंपनीने आपले उत्पादन मेक्सिकोमध्ये सुरू केल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या निशाण्यावर चीन आणि भारतासारखे देश होते. भारत आणि चीन अमेरिकन लोकांच्या नोकऱ्या हिसकावत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.