उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना गाढव हा शब्द वापरल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. आता या ‘गाढव’ शब्दावरुन आम आदमी पक्षाचे नेते कुमार विश्वास यांनी ओम प्रकाश आदित्य यांची कविता सादर करत अप्रत्यक्षपणे पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले आहे. ‘इधर भी गधे है’ म्हणत कुमार विश्वास यांनी सादर केलेल्या ओम प्रकाश आदित्य यांच्या कवितेचा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे. अखिलेश यादव आणि नरेंद्र मोदी यांनी एकमेकांवर केलेल्या टिकेमुळे ओम प्रकाश आदित्य यांची उपरोधिक कविता आठवल्याचे कुमार विश्वास यांनी म्हटले आहे. माईकसमोर उभे राहून हसणाऱ्या गाढवाच्या चित्राने या व्हिडिओची सुरुवात होते.

‘इधर भी गधे है, उधर भी गधे है, जिधर देखता हूँ, गधे ही गधे हैं. गधे हस रहे हैं, आदमी रो रहा है, हिंदुस्तान में ये क्या हो रहा है,’ अशा शब्दांमध्ये कुमार विश्वास यांनी सद्यस्थितीवर भाष्य केले आहे. जग हे गाढवांसाठी बनले आहे. सध्या त्यांचेच चांगले दिवस (अच्छे दिन) आहेत, याचेही वर्णन कुमार विश्वास यांनी कविता सादर करताना केले आहे. ‘घोडों को मिलती नहीं घास देखो, गधें खा रहे च्यवनप्राश देखो. यहां आदमी की कहा कब बनीं है, ये दुनिया गधो के लिये ही बनी हैं’, अशा शब्दांमध्ये कुमार विश्वास यांनी सध्याच्या परिस्थितीचे वर्णन केले आहे.

राजकारण्यांवर तोंडसुख घेताना वारंवार माईकसमोर भाषणे करणाऱ्या नेत्यांची कुमार विश्वास यांनी खिल्ली उडवली आहे. ‘जो गलियों में डोले, वो कच्चा गधा हैं. जो कोठे में बोले, वो सच्चा गधा है. जो खेतों में दिखे वो फसली गधी हैं. जो माईक पे चिखे वो असली गधी है,’ असे म्हणत कुमार विश्वास यांनी राजकारण्यांवर जबरदस्त निशाणा साधला आहे.