बँकेतील लॉकर हे सर्वात सुरक्षित ठिकाण समजले जाते. या लॉकरमधून मौल्यवान वस्तू हरवल्यास, गहाळ झाल्यास किंवा चोरी झाल्यास त्यासाठी बँकेला जबाबदार धरता येणार नाही असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे. माहितीअधिकारांतर्गत दाखल झालेल्या अर्जावर उत्तर देताना रिझर्व्ह बँकेने हे स्पष्टीकरण दिले आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि १९ राष्ट्रीय बँकांकडून एका वकिलाने माहिती अधिकारांतर्गत माहिती मागवली होती. यावर रिझर्व्ह बँकेने केलेला खुलासा बघून वकिलाला धक्काच बसला. लॉकरमधून वस्तू गहाळ किंवा चोरी झाल्यास ग्राहकाला नुकसान भरपाई देण्यासाठी नियमावली किंवा निकष अस्तित्वात नाही असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. विशेष म्हणजे बँकांनीही याबाबत हात वर केले आहेत. संबंधीत वकिलाने बँक ऑफ इंडिया, ऑरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, पंजाब नॅशनल बँक, यूको बँक, कॅनरा आणि अन्य बँकांकडे आरटीआयअंतर्गत अर्ज करुन माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. यात बँकांनी केलेला खुलासा अजब होता. लॉकर घेताना भाडेकरु आणि घरमालकात असलेल्या संबंधांमध्ये प्रमाणे बँक आणि ग्राहकाचे संबंध असतात. यानुसार बँकेच्या मालकीच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या मौल्यवान वस्तूंसाठी ग्राहकच जबाबदार असतो. काही बँकांनी लॉकर देताना अटींमध्येच हे स्पष्ट केले आहे. ग्राहकाने स्वतःच्या जबाबदारीवरच मौल्यवान वस्तू ठेवायला पाहिजे असे बँकेच्या अटीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. लॉकरमधून चोरी झाल्यास, गहाळ झाल्यास किंवा मौल्यवान वस्तूचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी बँकेची नव्हे तर ग्राहकाची असेल असे बँकांनी स्पष्ट केले.

बँकांचे हे उत्तर ऐकून वकिल कुश कार्ला यांनी आता भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाकडे (सीसीआय) तक्रार दाखल केली आहे. जर बँकेत मौल्यवान वस्तू ठेवून उपयोग होणार नसेल तर त्याऐवजी घरात ठेवण्यात गैर काय असा प्रश्न उपस्थित केला.