आम्ही एकाचवेळी दोन आघाड्यांवर लढा देऊ शकत नाही, असे महत्त्वपूर्ण विधान हवाई दलाचे प्रमुख बी. एस. धनोआ यांनी केले आहे. ‘एकाचवेळी दोन आघाड्यावर संघर्ष करण्यास मोठी क्षमता लागते. मात्र सध्या भारतीय नौदलाकडे दोन आघाड्यांवर एकाचवेळी लढण्याचे सामर्थ्य नाही,’ असे धनोआ यांनी म्हटले. कारगिल विजय दिनानिमित्त धनोआ बोलत होते. पाकिस्तानच्या काश्मीरमधील कुरापती आणि चीनसोबत सिक्किमजवळील डोक्लाममध्ये सुरु असलेला संघर्ष या पार्श्वभूमीवर धनोआ यांचे विधान अतिशय महत्त्वपूर्ण समजले जाते आहे.

कारगिल विजय दिनानिमित्त हवाई दल प्रमुख बी. एस. धनोआ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना कारगिल युद्धाविषयी प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांना उत्तरे देताना, ‘कारगिलसारखे युद्ध आता होणार नाही,’ असे धनोआ यांनी म्हटले. याविषयी पुढे बोलताना, ‘कारगिलसारखे युद्ध पुन्हा झाले, तर सैन्याकडे आवश्यक सामर्थ्य नाही,’ असे हवाई दल प्रमुख बी. एस. धनोआ यांनी म्हटले. ‘आम्ही युद्धासाठी सज्ज नाही, असा या विधानाचा अर्थ होत नाही. युद्धासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत,’ असेही त्यांनी म्हटले.

‘१९९९ मध्ये कारगिल युद्धादरम्यान हवाई दलात काही त्रुटी होत्या. मात्र त्यावेळी हवाई दलात असणाऱ्या त्रुटी आता दूर झाल्या आहेत. दिवसा हल्ले करण्याच्या क्षमतेत मोठी वाढ झाली आहे. आता हवाई दलाकडे मानवरहित विमाने आली आहेत. छोट्या छोट्या पोस्टवर लक्ष ठेवण्याचे काम मानवरहित विमानांकडून केले जाते,’ असेही बी. एस. धनोआ यांनी म्हटले.

‘कारगिल युद्धाआधी हवाई दलाने कधीही इतक्या उंचीवरुन हल्ला केला नव्हता. कारगिल युद्धाच्या आधी हवाई दलाकडून रेकी करण्यात आली होती. यानंतर आम्ही आक्रमक पवित्रा घेत बॉम्बफेक करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवशी आम्ही उंचावरुन बॉम्बवर्षाव करत होतो. त्यानंतर आम्ही रात्री बॉम्बफेक करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानकडे असणारी क्षेपणास्त्रे रात्री काम करु शकत नाहीत, याची आम्हाला कल्पना होती. त्यानंतर आम्ही दिवस-रात्र हल्ले सुरु केले. रात्रभरात करण्यात आलेल्या बॉम्बफेकीमुळे पाकिस्तानची अवस्था बिकट झाली,’ असेदेखील धनोआ यांनी म्हटले.