बांगलादेशात आयसिस या दहशतवादी संघटनेचे अस्तित्व असल्याचे पुरावे नाहीत शिवाय भारत, अमेरिका या देशांना संभाव्य धोक्यांची माहिती वेळोवेळी दिली जाते. दहशतवादाशी लढण्यास आमचा देश वचनबद्ध आहे, असे बांगलादेशचे परराष्ट्र राज्यमंत्री शहरयार आलम यांनी सांगितले.
ते म्हणाले की, प्रत्यक्षात आम्ही आतापर्यंत जो तपास केला आहे त्यात आयसिस व त्याच्याशी संबंधित संघटनांचे अस्तित्व असल्याचे पुरावे नाहीत. आयसिस बांगलादेशात पाय रोवत असल्याची अमेरिकेची गुप्तचर माहिती योग्य नाही त्याचा परिणाम म्हणून विरोधी पक्ष अवामी लीगला बदनाम करीत आहेत. आलम यांनी अमेरिकेचे परराष्ट्र राज्यमंत्री थॉमस शॉनन यांची भेट घेतली. त्यात दोन्ही देशातील संबंधांचा आढावा घेण्यात आला. अमेरिका व बांगलादेश यांच्यातील संबंध दोन वर्षांत चांगले असून त्यात नवी उंची गाठली गेली आहे. दोन्ही देशांनी एकमेकांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे असे त्यांनी सांगितले. आलम यांनी दक्षिण मध्य आशिया कामकाज मंत्री निशा देसाई बिस्वाल यांची भेट घेतली. आलम यांनी सांगितले की, अमेरिकेचे राष्ट्रीय गुप्तचर संचालक जेम्स क्लॅपर यांनी बांगलादेशात शेख हसीना वाजेद विरोधकांना दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याने दहशतवादी गटांचे प्राबल्य वाढू शकते, असे विधान केले होते. त्यावर आमच्या देशाची नाराजी आहे. बांगालदेश नॅशनल पार्टी व जमाते इस्लामीच्या काळात सरकारनेच दहशतवाद्यांना खतपाणी घातले होते. अलीकडे ब्लॉगर्सच्या ज्या हत्या झाल्या त्यात जमाते इस्लामी व बांगलादेश नॅशनल पार्टी यांचा हात आहे.