देशविरोधी कृती करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. पण देशद्रोहाच्या नावाखाली विरोध करणाऱ्यांचा आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न करू नका, असा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आणि खासदार सीताराम येचुरी यांनी गुरुवारी राज्यसभेत दिला. आम्ही ठरवू तोच राष्ट्रवाद हे लादण्याचा प्रयत्नही केंद्र सरकारने करू नये, असेही त्यांनी सांगितले.
रोहित वेमुला आत्महत्या आणि जेएनयू प्रकरणावरील चर्चेला राज्यसभेत गुरुवारी सकाळी सुरुवात झाली. शून्यकाळ स्थगित करून ही चर्चा सुरू करण्यात आली. चर्चेच्या सुरूवातीला येचुरी यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर टीका केली. ते म्हणाले, जेएनयूतील विद्यार्थ्यांनी देशविरोधी कृती केली असेल, तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण देशविरोधी कृती ठरवून विरोध करणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकारने करू नये. विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडे शत्रू म्हणून पाहू नका. त्यांच्या समस्या जाणून घेऊन आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न सरकारने केला पाहिजे. आम्ही ठरवू तोच राष्ट्रवाद हा विचार सर्वांवर लादण्याचा प्रयत्न केला जाऊ नये, असेही त्यांनी सांगितले.
देशातील विद्यापीठांमध्ये राष्ट्रध्वज लावण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यावर येचुरी म्हणाले, विद्यापीठातील तिरंग्यापेक्षा आमच्या ह्रदयातील तिरंगा जास्त मोठा आहे. त्यामुळे दुसऱ्या कोणीतरी आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवण्याची गरज नाही. केवळ भाषणं करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली वाहून चालणार नाही. तर त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून चालून देशातील मागासवर्गीयांच्या हितासाठी कठोर कायदा केला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला नॅशनल हिरो करण्याचा प्रयत्न करू नका, असेही त्यांनी सांगितले.