स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेले आपले भाषण दूरदर्शन आणि आकाशवाणीने प्रसारित करण्यास नकार दिल्याचा आरोप त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांनी केला आहे. जोपर्यंत भाषणात बदल करत नाही तोपर्यंत ते प्रसारित करणार नसल्याचे संबंधित विभागाने म्हटल्याचे सरकार यांनी सांगितले. केंद्र सरकारचे हे पाऊल लोकशाहीविरोधातील असहिष्णू पाऊल असल्याचे म्हटले आहे.

दूरदर्शन आणि आकाशवाणीचे नेतृत्व करणाऱ्या प्रसारभारतीने याप्रकरणी अद्याप काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्रिपुरा सरकारच्या वतीने जारी करण्यात आलेल्या निवेदनात दूरदर्शन आणि आकाशवाणीवर आरोप करण्यात आले आहे. दि. १२ ऑगस्ट रोजी माणिक सरकार यांचे भाषण चित्रित करण्यात आले. नंतर मुख्यमंत्री कार्यालयाला एक पत्र लिहून भाषणात जोपर्यंत बदल केले जात नाही. तोपर्यंत ते प्रसारित केले जाणार नसल्याचे म्हटले.

माणिक सरकार यांनी आपल्या भाषणातील एक शब्दही बदलणार नसल्याचे स्पष्ट करत हे लोकशाही विरोधी पाऊल असल्याचे त्यांनी  म्हटल्याचा दावा मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आला आहे. माणिक सरकार यांचे हे भाषण स्वातंत्र्य दिनी दूरदर्शन आणि आकाशवाणीवर प्रसारित होणार होते.

मार्क्सवादीचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनीही राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि भाजपवर आरोप केले. दूरदर्शन आरएसएस-भाजपची वैयक्तिक संपत्ती नाही. पंतप्रधान मोदी आपल्या जवळच्या लोकांना सांगून विरोधी पक्षाचा आवाज दाबत आहेत. यामध्ये एका मुख्यमंत्र्याचाही समावेश असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान, दूरदर्शनने मुख्यमंत्री माणिक सरकार यांचे भाषण प्रसारित करण्यास नकार दिला आहे. पंतप्रधान मोदी हे अशाचप्रकारच्या सहयोगात्मक संघवादाची नेहमी चर्चा करतात का? ही लाजीरवाणी बाब आहे, अशा आशयाचे ट्विट मार्क्सवादीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून करण्यात आले आहे.

ही हुकूमशाही आणि अघोषित आणीबाणी नाही काय, असा सवाल येचुरी यांनी केला आहे. याविरोधात मार्क्सवादी पक्ष, त्रिपुराची जनता आणि आमचे सर्व नागरिक याविरोधात लढतील, असा दावा त्यांनी केला.