खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची लोकसभेत मागणी

डॉक्टरांवरील वाढते हल्ले रोखण्यासाठी कठोर केंद्रीय कायदा करण्याची मागणी कल्याणचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी लोकसभेत केली.

मागील आठवडय़ात धुळे जिल्हा रुग्णालयात डॉ. रोहन महामुनकर यांच्यावर रुग्णाच्या नातेवाईकांनी हल्ला करून त्यांना बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत डॉ. महामुनकर यांच्या एका डोळ्याला गंभीर इजा झाली आहे. त्या पाश्र्वभूमीवर डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी लोकसभेत शून्य प्रहरात औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे सरकारचे लक्ष वेधले.

महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांत डॉक्टरांना मारहाण होण्याच्या ५०च्या आसपास घटना घडल्या आहेत. ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या अहवालानुसार किमान ७५ टक्के डॉक्टरांना कामाच्या ठिकाणी हिंसाचाराला सामोरे जावे लागते, अशी माहिती त्यांनी लोकसभेत दिली.

रेल्वे स्थानकांची नावे बदला..

दरम्यान, मुंबईमधील ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस’ (सीएसटी) या रेल्वे स्थानकाचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ तसेच ‘एल्फिन्स्टन रोड’ रेल्वे स्थानकाचे नाव ‘प्रभादेवी’ करण्याची मागणी राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे केली. या वेळी शिवसेना खासदार अरविंद सावंत, श्रीरंग बारणे उपस्थित होते. महाराष्ट्र मंत्रिमंडळाबरोबर विधिमंडळातही नावे बदलण्याचा प्रस्ताव संमत झालेला आहे. आता फक्त गृहमंत्रालयाच्या संमतीची प्रतीक्षा आहे.