येमेनमधील मध्यवर्ती बाइदा प्रांतात करण्यात आलेल्या ड्रोनहल्ल्यात अल-कायदाचे १५ संशयित आणि तीन नागरिक ठार झाले आहेत. बाइदा प्रांत दहशतवाद्यांचा बालेकिल्ला आहे, असे सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले.
सदर जिहादी दक्षिणेकडील शाबवा प्रांतात एका वाहनातून जात होते, तर तीन नागरिक एका मोटारीतून जात होते. येमेनमध्ये ड्रोनचा वापर करणारा अमेरिका एकमेव देश आहे.
अल-कायदाच्या विरोधात ड्रोनहल्ले करण्याचे समर्थन गेल्याच आठवडय़ात येमेनचे अध्यक्ष अबद्राबुह हादी यांनी केले होते.
अल-कायदाच्या कारवाया रोखण्यासाठी ड्रोनहल्ले फायदेशीर आहेत. मात्र मानव हक्क कार्यकर्त्यांकडून या हल्ल्यांबाबत जोरदार टीका केली जात आहे.