शिक्षणाधिकार कायद्यानंतर शिक्षणाचा दर्जा २५ टक्क्य़ांनी घसरला, असे मत माजी कॅबिनेट सचिव टीएसआर सुब्रम्हण्यम यांनी व्यक्त केले, शिक्षणाधिकारामुळे अनेक चांगल्या गोष्टी घडल्या पण दर्जा घसरला, कारण शिक्षणाधिकारात पायाभूत सुविधांवर भर आहे. २०१० ते २०१४ या काळात या अधिकारामुळे शिक्षणाचा दर्जा २५ टक्के घसरला, असे त्यांनी एका चर्चेत सांगितले.

दर्जात्मक शिक्षण असणे आवश्यक आहे असे सांगून ते म्हणाले की, भारतातील धोरणाकारांनी दर्जात्मक शिक्षणाकडे दुर्लक्ष केले. खाणे व श्वास घेणे याइतकेच मुलांकरता शिक्षण महत्त्वाचे आहे. त्यासाठी अनुकूल वातावरण असले पाहिजे, चांगले शिक्षक असले पाहिजेत तर मुले आपोआप शिकतात. आपण शिक्षणपद्धती गुंतागुंतीची केली आहे असे त्यांनी स्पष्ट केले. केअर इंडिया संस्थेने आयोजित केलेल्या ‘माय सेफ्टी माय एज्युकेशन माय राइट – मेकिंग एज्युकेशन सेफ अँड सिक्युअर’ या चर्चासत्रात ते बोलत होते. चाळीस वर्षांपूर्वी मी हार्वर्डला शिकलो तेव्हा तेथे त्यावेळीच आम्हाला मुलींचे शिक्षण हा देशाच्या विकासाचा प्रमुख भाग असल्याचे सांगण्यात आले पण आपल्याकडे ही गोष्ट अजून पुरेशी लक्षात आलेली नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले.