उत्तर प्रदेशला बसलेल्या धुळीच्या वादळाच्या तडाख्यात आतापर्यंत २७ जण ठार झाले असून ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत. फारूकाबाद येथे दहा जण, बाराबंकी येथे दोन मुलांसह सहा जण आणि लथनऊ, सीतापूर येथे प्रत्येकी तीन, हरदोई आणि जालौन येथे प्रत्येकी दोन आणि फैजाबाद येथे एक जण ठार
झाला.
सोसाटय़ाचे वारे आणि त्यानंतर आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी वृक्ष, विजेचे खांब उन्मळून पडले. त्याचप्रमाणे अनेक झोपडय़ाही जमीनदोस्त झाल्या. त्यामुळे सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. राजस्थानात निर्माण झालेल्या स्थितीमुळे वादळ आणि पाऊस कोसळला, असे हवामान खात्याच्या वतीने सांगण्यात आले.
फारूकाबादमध्ये भिंत कोसळून १० जण ठार झाले आणि वृक्ष उन्मळून पडले. मेमपूर, कातरी, मल्लाई, दाईपूर, करणपूर, बुधैय्या, जारवा या गावांना वादळाचा तडाखा बसला. बाराबंकीमध्ये कोटवा सडक, सिंधवाही, देबरा, दादीयामऊ, मोहसाद या गावातही भिंत अंगावर कोसळल्याने सहा जण ठार झाले.
लखनऊमध्ये भिंत अंगावर कोसळून एक जण ठार झाला तर उन्मळून पडलेल्या वृक्षाखाली गाडले जाऊन एक ठार झाला. सीतापूर, हरदोई, फैजाबाद येथेही अशा प्रकारच्या दुर्घटनांमध्ये तीन जण ठार झाले. दुर्घटनांबाबतचा अधिक तपशील अद्यापही प्रलंबित असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
चित्रपटाच्या चित्रीकरणाला धुळीच्या वादळाचा तडाखा
प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा प्रथमच निर्मिती करीत असलेल्या एनएच १० चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी राजस्थानात अचानक धुळीचे वादळ झाले पण त्यात कुणीही जखमी झाले नाही. अनुष्का या चित्रपटात प्रमुख भूमिका करीत असून तिने या घटनेची माहिती ट्विटरवर दिली. एनएच १० या चित्रपटाच्या चित्रीकरणप्रसंगी आम्हाला वाळूच्या वादळास तोंड द्यावे लागले. भीषण असे हे वादळ होते पण सर्व काही ठीक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नवदीप सिंग करीत असून त्यांनी यापूर्वी मनोरमा सिक्स फीट अंडर या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण उत्तर भारतात सुरू असून तो १२ सप्टेंबरला प्रसृत केला जाणार आहे.