अमेरिकेतील भाषणात भारतातील घराणेशाहीचे अप्रत्यक्ष समर्थन करणाऱ्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींवर भाजप अध्यक्ष अमित शहांनी तोंडसुख घेतले आहे. ‘आमचा पक्ष कामगिरीवर लक्ष केंद्रीत करतो. मात्र काँग्रेसमध्ये घराणेशाहीला स्थान दिले जाते. भाजपचा कामगिरीवर, तर काँग्रेसचा घराणेशाहीवर विश्वास आहे,’ अशा शब्दांमध्ये शहांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले. ते भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत बोलत होते.

भाजपचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना अमित शहांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. अमेरिकेतील बर्कले विद्यापीठात बोलताना राहुल गांधींनी घराणेशाहीचे अप्रत्यक्ष समर्थन केले होते. त्यावरुन शहांनी राहुल गांधींना लक्ष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद त्यांच्या कामामुळे सर्वोच्च पदांपर्यंत पोहोचले, असे शहांनी म्हटले. ‘भाजपमध्ये कामगिरीला प्राधान्य दिले जाते. मात्र काँग्रेसमध्ये घराणेशाहीला झुकते माप दिले जाते,’ अशा शब्दांमध्ये त्यांनी राहुल गांधींच्या विधानाचा समाचार घेतला. अमित शहांसोबतच केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनीही राहुल गांधींवर टीका केली.

दोन आठवड्यांपूर्वी बर्कले विद्यापीठात राहुल गांधींना एका व्यक्तीने घराणेशाहीबद्दल प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना भारतात सर्वच क्षेत्रांमध्ये घराणेशाही असल्याचे म्हटले. ‘अभिषेक बच्चन, अखिलेश यादव ही देशातील घराणेशाहीची उदाहरणे आहेत. अभिनय, राजकारण आणि कॉर्पोरेट अशा सर्वच क्षेत्रांमध्ये घराणेशाही पाहायला मिळते. अशाच पद्धतीने देश चालतो,’ असे राहुल गांधींनी बर्कले विद्यापीठात म्हटले होते.

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीला नवी दिल्लीत सुरुवात झाली असून बैठकीला पक्षाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत. या बैठकीला भाजपचे १५ मुख्यमंत्री, ६ उपमुख्यमंत्री, विधानसभेचे १४०० आमदार, विधान परिषदेचे ८५ आमदार, २८० मंत्री आणि ३३६ खासदार उपस्थित आहेत. बैठकीच्या माध्यमातून भाजपने राष्ट्रीय पातळीवर शक्तीप्रदर्शन केले आहे. गुजरात, मध्य प्रदेशमधील निवडणुका जवळ असल्याने भाजपची ही बैठक महत्त्वाची आहे.