लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घवघवीत यश मिळवून देण्यात मोठा वाटा उचलणाऱ्या सोशल मीडियावर आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनीही अधिक सक्रीय व्हावे, असा सल्ला खुद्द मोदी यांनी दिला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्येक मंत्र्याने ट्विटरवर कमीत कमी एक लाख फॉलोअर तरी मिळावावेत, अशी भूमिका मोदींनी मांडली आहे. त्याचबरोबर तुम्ही करत असलेले काम, यशकथा सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत घेऊन जा, असेही त्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी कशा पद्धतीने होते आहे, याचा आढावा घेण्यासाठी बोलावण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोशल मीडियाचा विषय निघाल्यावर स्वतः मोदी यांनी मंत्र्यांना मार्गदर्शन केल्याची माहिती मिळते आहे. पंतप्रधान कार्यालयात माहिती-तंत्रज्ञान विभागात कार्यरत असलेले अधिकारी हिरेन जोशी यांनी यावेळी एक प्रेझेंटेशनही दिले. ज्यामध्ये सोशल मीडियावर कोणत्या गोष्टी टाळायच्या आणि कोणत्या गोष्टी करायच्या याबद्दल माहिती देण्यात आली. अधिकाधिक फॉलोअर्स आणण्यासाठी काय करता येईल, याबद्दल काही टीप्स यावेळी मंत्र्यांना देण्यात आल्या.
ट्विटरवर मोदींचे असंख्य फॉलोअर्स आहेत. ते स्वतः ट्विटरचा पूर्ण कार्यक्षमतेने वापर करतात. अनेक निर्णय, मतं, विचार ट्विटरच्या माध्यमातूनच शेअर करतात. पहिल्यापासूनच मोदी स्वतः सोशल मीडियाचा गंभीरपणे वापर करत आले आहेत. त्यामुळेच आता मंत्रिमंडळातील इतर सदस्यांनीही या माध्यमाचा वापर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत सरकारी निर्णय पोहोचवावेत, अशी त्यांची अपेक्षा आहे.