ओडिशातील चंडीपूर चाचणी क्षेत्रात स्वदेशी बनावटीच्या पृथ्वी २ या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीरीत्या घेण्यात आली. या क्षेपणास्त्राच्या मदतीने अण्वस्त्रे वाहून नेता येतात. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे हे क्षेपणास्त्र संकुल तीनच्या चलत प्रक्षेपकावरून सोडण्यात आले. सकाळी ९.४० वाजता ही चाचणी करण्यात आल्याचे संरक्षण सूत्रांनी सांगितले. पृथ्वी २ या क्षेपणास्त्राच्या आणखी दोन चाचण्या लागोपाठ करण्यात येणार होत्या, पण दुसरी चाचणी काही तांत्रिक कारणास्तव लांबणीवर टाकण्यात आली. अशाच दोन चाचण्या १२ ऑक्टोबर २००९ मध्ये घेण्यात आल्या होत्या व त्या यशस्वी झाल्या होत्या. या क्षेपणास्त्राचा मारक पल्ला ३५० किमी असून ते ५०० ते १००० किलोची अस्त्रे वाहून नेऊ शकते. त्यात द्रव इंधन असलेली दोन इंजिने वापरली असून, त्यात प्रगत यंत्रणा वापरण्यात आल्या आहेत, त्यामुळे लक्ष्यभेद करण्याची त्याची क्षमता जास्त आहे. चाचणी केलेले क्षेपणास्त्र यादृच्छिक पद्धतीने निवडण्यात आले होते, ही चाचणी स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडच्या निरीक्षणाखाली घेण्यात आली व त्या वेळी संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे वैज्ञानिक उपस्थित होते. क्षेपणास्त्राचा मार्ग हा डीआरडीओची रडार, ओडिशातील किनारी भागातील दूरसंदेश केंद्रे यांनी टिपला. बंगालच्या उपसागरात अंतिम लक्ष्य भेदले जाणार असल्याने तेथेही निरीक्षण पथके होती. पृथ्वी २ क्षेपणास्त्र २००३ मध्ये भारतीय लष्करात दाखल केले असून ते ९ मीटर उंच आहे. त्यात द्रव इंधनाचा वापर केलेला आहे. संरक्षण संशोधन व विकास संस्थेने एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमात तयार केलेले ते पहिले क्षेपणास्त्र होते. पृथ्वी २ क्षेपणास्त्राची याआधीची उपयोजित चाचणी १६ फेब्रुवारी २०१६ रोजी ओडिशातील चाचणी केंद्रावरून यशस्वीरीत्या करण्यात आली होती.