वैज्ञानिकांनी पृथ्वीच्या आकाराचा ग्रह गोल्डीलॉक भागात शोधला असून त्यावर जीवसृष्टीस अनुकूल असलेले पाणी व इतर गोष्टी असण्याची शक्यता आहे.नासाच्या ‘केप्लर’ या अवकाश दुर्बिणीच्या मदतीने हा ग्रह शोधून काढण्यात आला असून तो अधिवास क्षेत्रातील ताऱ्याभोवती फिरत असून त्याला ‘केप्लर १८६ एफ’ असे नाव देण्यात आले आहे. सूर्याशिवाय काही ताऱ्यांच्या अधिवास क्षेत्रात वस्ती करण्यायोग्य स्थिती असलेले ग्रह आहेत, त्याला ‘गोल्डीलॉक झोन’ असे म्हणतात, असे नासाने म्हटले आहे.
या भागातील ग्रहांवर पाणी हे द्रव अवस्थेत राहील अशी स्थिती असते, म्हणजे ते ग्रह ताऱ्यापासून विशिष्ट अंतरावर असतात. आतापर्यंत या पट्टय़ात सापडलेल्या ग्रहांमध्ये पृथ्वीच्या ४० टक्के मोठे ग्रह सापडले असून त्यांची रचना वेगळी आहे. मात्र, केप्लर १८६ एफ हा पृथ्वीसारखा आहे.
केप्लर १८६ एफ हा पृथ्वीच्या आकाराचा वसाहतयोग्य ग्रह सापडणे ही फार महत्त्वाची बाब आहे, असे नासाच्या खगोलभौतिकशास्त्र विभागाचे संचालक पॉल हर्ट्झ यांनी सांगितले. या ग्रहाचा आकार माहिती असला तरी त्याचे वस्तुमान व रचना मात्र माहिती नाही. यापूर्वीच्या संशोधनानुसार केप्लर १८६ एफ हा ग्रह खडकाळ आहे.
नासाच्या अ‍ॅमेस रीसर्च इन्स्टिटय़ूटच्या अ‍ॅमेस संशोधन केंद्राच्या एलिसा क्विंटाना यांनी सांगितले की, पृथ्वीच्या आकाराचा वसाहतयोग्य ग्रह सापडणे ही महत्त्वाची बाब आहे. केप्लर १८६ एफ हा केप्लर १८६ प्रणालीत सापडला असून पृथ्वीपासून ५०० प्रकाशवर्षे दूर हंस तारकासमूहात आहे. त्याच्या बरोबर इतर चार ग्रह असून ते सूर्यापेक्षा निम्म्या वस्तुमान व आकाराच्या ग्रहाभोवती फिरत आहेत. या ताऱ्याचे वर्गीकरण ‘एम बटू’ तारा किंवा ‘तांबडा बटू’ तारा असे करण्यात आले असून आपल्या आकाशगंगेतील ७० टक्के तारे या प्रवर्गातील आहेत. एम बटू तारे असलेल्या ठिकाणी जीवसृष्टीस अनुकूल स्थिती असलेले ग्रह फिरत असण्याची शक्यता जास्त असते. केप्लर १८६ एफ हा ग्रह त्याच्या मातृताऱ्याभोवती १३० दिवसात फिरतो व त्याला सूर्यापासून पृथ्वीला जेवढी ऊर्जा मिळते त्याच्या एक तृतीयांश ऊर्जा त्या ताऱ्यापासून मिळते. या ग्रहावर भर दुपारी आपल्याकडे सूर्यास्ताच्यावेळी जेवढा प्रकाश असतो तेवढा दिसून येतो. हा ग्रह वसाहतयोग्य पट्टय़ात आहे, याचा अर्थ तो वसाहतयोग्य आहेच असे नाही. त्याचे तपमान किती आहे यालाही महत्त्व आहे, असे बे एरिया पर्यावरण संशोधन संस्थेतील थॉमस बार्कले यांनी सांगितले.
पृथ्वीचा जुळा भाऊ शोभण्यापेक्षा ‘केप्लर १८६ एफ’ हा चुलतभाऊ शोभतो, त्याचे बरेच गुणधर्म पृथ्वीसारखे आहेत असे बार्कले यांचे म्हणणे आहे. हे संशोधन ‘सायन्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.
केप्लर १८६ एफ ग्रह असा आहे
* पृथ्वीपासून ५०० प्रकाशवर्षे दूर
* तांबडा पटू ताऱ्याचा प्रकार
* खडकाळ स्थिती
* गोल्डीलॉक भागातील वसाहतयोग्य ग्रह
* भरदुपारी सूर्यास्ताइतका प्रकाश
* ताऱ्याभोवती १३० दिवसात प्रदक्षिणा पूर्ण