पाकिस्तान, अफगाणिस्तानात मोठी जीवितहानी ल्ल भारतातही धक्के; काश्मीरमध्ये दोन जखमी
उत्तर भारतात सोमवारी दुपारी ७.५ तीव्रतेचा मोठा भूकंपाचा हादरा बसला असून त्यात काश्मीरमधील सोपोर येथे लष्कराचे दोन जवान जखमी झाले आहेत. या भूकंपानंतर मोठय़ा प्रमाणात घबराट निर्माण झाली. या भूकंपाने अफगाणिस्तानात ३५ तर पाकिस्तानात १४५ जण ठार झाले. दिल्लीत मेट्रोलाही हादरा बसल्याने गाडय़ा पंधरा मिनिटे थांबवाव्या लागल्या. त्यामुळे हजारो प्रवासी अडकून पडले. दुपारी २.४० ते २.५५ दरम्यान मेट्रो सेवा थांबवण्यात आली. पाकिस्तानात खैबर पख्तुनवा ९६, पंजाब ५, पाकव्याप्त काश्मीर ४ याप्रमाणे १०५ जण ठार झाले तर १००० जण जखमी झाले आहेत.
दुपारी २.४० वाजता हिंदुकुश या अफगाणिस्तानातील पर्वतराजीत केंद्र असलेल्या या भूकंपाचा जोरदार धक्का काश्मीर, दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड व राजस्थान येथे जाणवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिस्थितीचा आढावा घेतला असून अफगाणिस्तान व पाकिस्तानलाही मदतीची तयारी दर्शवली आहे. काश्मीरमध्ये सोपोर येथे दोन जवान जखमी झाले असून गांजू हाउस येथे एक बंकर कोसळला, त्यात दोन जवान जखमी झाले. श्रीनगर येथे जहांगीर चौक येथे उड्डाणपुलाला तडे गेले आहेत. राष्ट्रीय भूकंप केंद्राच्या माहितीनुसार भूकंपाचे केंद्र हिंदूकुश पर्वतराजीत १९० कि.मी. खोलीवर होते. या भूकंपाने उत्तर भारतात घबराट पसरली. उत्तरा खंड येथे रहिवासी घराबाहेर पळाले. मसुरी, डेहराडून, हरिद्वार, रूडकी व हृषीकेश येथे जोरात धक्का बसला. पंजाब, हरयाणा व चंडीगड येथेही धक्के बसले. अंबाला, कुरुक्षेत्र, कर्नाल, पानिपत, सोनेपत, गुडगाव, रोहतक, फरिदाबाद, पंचकुला, फतेहाबाद, सिरसा, भिवानी येथेही धक्के बसले आहेत. उत्तर प्रदेशात कमी तीव्रतेचा धक्के बसल्याचे सांगण्यात आले. राजस्थानात जयपूर, जोधपूर, सिकर येथे धक्के बसले. दरम्यान, अफगाणिस्तान व पाकिस्तानातही हा धक्का बसला असून अफगाणिस्तानातील तालुकान शहरात एका शाळेतील मुले घाबरून पळाल्याने चेंगराचेंगरी झाली. त्यात १२ मुली मरण पावल्या. अफगाणिस्तानात भूकंपाने १८ जण ठार झाले. अफगाणिस्तानातील तखार प्रांताचे शिक्षण प्रमुख इनायत नावीद यांनी सांगितले, की शाळेतून मुले बाहेर पडत असताना चेंगराचेंगरी झाली. पाकिस्तान नजीक नानगरहर येथे सहा ठार तर ६९ जण जखमी झाले. अमेरिकी भूगर्भशास्त्र सर्वेक्षण प्रयोगशाळेच्या निरीक्षणानुसार भूकंपाचे केंद्र बदाखशान प्रांतात तखहारच्या शेजारी जुर्म येथे २१३.५ कि.मी. खोलीवर होते. हजारो लोक घाबरून रस्त्यावर पळाले.
पाकिस्तानात पेशावरमध्ये १८ जण मरण पावल्याचे माहितीमंत्री मुश्ताक घनी यांनी सांगितले. स्वात खोऱ्यात आठ जण मरण पावले असून त्यात महिला व मुलांचा समावेश आहे. बाजौर भागात इमारत कोसळून चार जण ठार झाले. कल्लार कहार येथे आठ वर्षांचे मूल मरण पावले. पाकव्याप्त काश्मीरमध्ये मीरपूर येथे शाळेची भिंत कोसळून १४ वर्षांचा मुलगा मरण पावला. खैबर पख्तुनावाला येथे एक महिला ठार तर १० जण जखमी झाले. चित्राल येथे १३ जण ठार झाले तर रावळपिंडीत एका मुलाचा छत कोसळून मृत्यू झाला. १९४ जखमींना स्वातमधील सैदू शरीफ रुग्णालयात दाखल केले आहे. पेशावरमधील लेडी रीडिंग रुग्णालयात १०० जण जखमी झाले आहेत. कराची लाहोर, इस्लामाबाद, रावळपिंडी, पेशावर, क्वेट्टा, कोहाट व मलाकंद येथे धक्के बसले.