जर भूकंप झाला तर इमारतींचे किती नुकसान होऊ शकते याचा आलेख तयार करणारे यंत्र इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या हैदराबादच्या संस्थेने तयार केले आहे.
 भूकंप झाल्यानंतर घरांची हानी मोठय़ा प्रमाणावर होते त्याचे नकाशे अत्याधुनिक संवेदकांच्या मदतीने काढण्याचे हे तंत्रज्ञान आहे. चंडिगढ येथे नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने इमारतींचे संभाव्य भूकंप हानी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानाला टूल फॉर कॉम्प्रिहेन्सिव्ह सेसमिक रिस्क अ‍ॅसेसमेंट ऑफ बिल्डिंग ( सीएसआरएबी) असे म्हटले जाते ते आयआयआयटीचे प्रा. रामचंद्र प्रदीप कुमार व त्यांच्या सहकाऱ्यांनी तयार केले आहे.
कुमार यांच्या मते घरांच्या संभाव्य हानीचा अंदाज घेण्यासाठी ही अचूक पद्धत असून त्यात भूकंपामध्ये इमारतीची किती हानी होऊ शकते यांचे स्कोअरकार्डच दिले जाते, त्याला रॅपिड व्हिज्युअल स्कोअर ऑफ द बिल्डिंग असे म्हटले जाते. यात हानी नाही. थोडी हानी, मध्यम हानी, खूप हानी व घर कोसळणे असे वर्गीकरण करण्यात आले असून त्यात किती लोकांना हानीचा फटका बसेल हे सांगितले जाते. ही हानी कुणाच्या हातात नसते, पण सरकारी धोरणांच्या मदतीने हानी वाचवता येऊ शकते. कुमार यांनी सांगितले, की पन्नास वर्षांपूर्वी भारत, टोकियो किंवा कॅलिफोर्निया येथील भूकंपात होणारी हानी सारखीच होती. आता भारतातील हानी कॅलिफोर्निया व टोकियोपेक्षा जास्त असेल, कारण भारतातील इमारत बांधणी वाईट दर्जाची आहे.
इमारतींना भूकंपाचा धोका असल्याचा अंदाज घेण्याचा प्रकल्प गुजरातमध्ये गांधीग्राम व आदिपूर या झोन ५ व झोन ४ या क्षेत्रातील शहरात हा सुरू करण्यात आला. त्यात १५ हजार इमारतींचे सर्वेक्षण करण्यात आले. नांदेड-वाघाळा तसेच हिमाचल प्रदेशातील एका ठिकाणी असे सर्वेक्षण करण्यात आले. यातून घरमालकांना त्यांच्या इमारतीस किती धोका आहे हे समजते.
आता हैदराबादेतील आयआयआयटी या हैदराबादच्या संस्थेने दिशानेट हा प्रकल्प जपान-भारत सहकार्यात हाती घेतला आहे, त्याचे संवेदक जपानने पुरवले असून त्या प्रकल्पाची अंमलबजावणी चंडिगढ येथे केली जाणार आहे कारण चंडिगढ हे सर्वात चांगले नियोजन असलेले शहर मानले जाते. पण ते जास्त भूकंपप्रवण क्षेत्रात येते.
या प्रकल्पाची किंमत २० कोटी असून एनडीआरआय, आयआयटी हैदराबाद, आयआयटी कानपूर, आयआयआयटी हैदराबाद व टोकियो विद्यापीठ यांचा त्यात सहभाग आहे.
*भारतातील भूकंपप्रवण क्षेत्र- जमिनीच्या ६० टक्के
*झोन ५ मध्ये येणारे क्षेत्र (तीव्र भूकंप)- १२ टक्के
*झोन ४ मध्ये येणारे क्षेत्र (मध्यम भूकंप)- २६ टक्के
*झोन २ मध्ये येणारे क्षेत्र (कमी भूकंप)- ४४ टक्के
*भारतात जमिनीवर राहणारी लोकसंख्या- ५२ टक्के