नेपाळमध्ये शनिवारी व रविवारी झालेल्या भूकंपात काष्ठमंडप या ऐतिहासिक मंदिराचे मोठे नुकसान झाले. ८० वर्षांपूर्वी नेपाळमधील भूकंपात १० हजार लोक मरण पावले होते. त्यानंतर प्रथमच इतका भीषण भूकंप नेपाळमध्ये झाला आहे. पशुपतीनाथाच्या मंदिराचीही हानी झाल्याचे वृत्त रविवारी देण्यात आले.

काष्ठमंडप, पाचतळे मंदिर, नऊ मजली बसंतपूर दरबार, दास अवतार मंदिर, कृष्ण मंदिर या भूकंपात कोसळले. काष्ठमंडप या मंदिरावरून या शहराला काठमांडू नाव पडले व ते सोळाव्या शतकातील लाकडी मंदिर आहे. इतिहासकार पुरुषोत्तम लोचन श्रेष्ठ यांनी सांगितले की, काठमांडू, भक्तपूर व ललितपूर येथे युनोचा जागतिक वारसा मिळालेली अनेक पर्यटन स्थळे देशाने गमावली आहेत.

ही ठिकाणे आता पूर्वीच्या अवस्थेत आणता येणार नाहीत असे त्यांनी सांगितले. काल ७.९ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपानंतर अनेक धक्के बसले असून काठमांडूतील दरबार चौक भागातील ८० टक्के मंदिरे कोसळली आहेत.

धरहरा मनोरा पत्त्यासारखा कोसळला. त्या खाली १८० हून अधिक लोक मरण पावले. धरहरा मनोरा ८३ वर्षांपूर्वी म्हणजे १९३४ मधील भूकंपात काही प्रमाणात कोसळला होता. त्या भूकंपात १० हजार लोक मरण पावले होते. पाटण व भक्तापूर येथील अनेक ऐतिहासिक मंदिरे काही प्रमाणात कोसळली आहेत.