इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटांना गुरुवारी भूकंपाचा जोरदार धक्का बसल्याने नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली. भूकंपामुळे ८ लोक जखमी झाले असून अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे.
रिश्टर स्केलवर ६.५ तीव्रतेच्या या भूकंपाचा धक्का गुरुवारी पहाटे जाणवल्यानंतर सुमात्राच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या पाडांग या बंदराच्या शहरातील लोक खडबडून जागे झाले आणि जीव वाचवण्यासाठी घराबाहेर धावू लागले. धास्तावलेल्या लोकांनी उंच जागी जाण्याचे प्रयत्न सुरू केले.
या भूकंपाचे केंद्र पाडांगपासून सुमारे १४० किलोमीटर अंतरावर असल्याचे अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र सर्वेक्षण विभागाने सांगितले.
भूकंपाच्या धक्क्य़ानंतर त्सुनामीचा कुठलाही इशारा जारी करण्यात आला नाही.
पाडांगमध्ये कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबून दोन जण गंभीररीत्या जखमी झाल्याचे आपदा व्यवस्थापन संस्थेच्या प्रवक्त्याने सांगितले.
भूकंपानंतर पाडांगमधील ८० वर्षे वयाचा एक वृद्ध हृदयविकाराच्या धक्क्य़ाने मरण पावला; मात्र त्याच्या मृत्यूचा भूकंपाशी संबंध होता काय हे स्पष्ट झालेले नाही.