जर्मनीतील कंपनीच्या उत्पादनाला हरयाणा सरकारचा प्रतिसाद
भूकंप काही सांगून होत नसतो किंवा त्याचा अंदाज आधी देता येत नाही, नेपाळमध्ये अजूनही मोठय़ा भूकंपाची शक्यता आहे. अलीकडेच उत्तर भारतात भूकंपाचे धक्के बसले होते. भूकंपात प्राणहानी जास्त होण्याचे कारण म्हणजे काही वेळा भूकंप रात्री होतात त्यावेळी लोक झोपेत असल्याने त्यांना धक्के कळतही नाहीत, पण आता भूकंप लहरी इमारतीला स्पर्श करू लागल्या की, लगेच सावध करणारी यंत्रणा जर्मन कंपनीने तयार केली आहे. विशेष म्हणजे ती भारतात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अर्ली अर्थक्वेक वॉìनग अँड सिक्युरिटी सिस्टीम असे या यंत्रणेचे नाव असून ती इमारतीत लावता येते. भूकंपाच्या पी लहरी या आधी येतात. त्या काहीशा कमकुवत असतात. नेमक्या या प्राथमिक लहरी येत असतानाच लोकांना सावध करण्याचे काम या यंत्रणेने करता येणार आहे. पी लहरीनंतर एस लहरी येतात. या भूकंप लहरी पी लहरींपेक्षा शक्तिमान असतात, त्यामुळे आधीच सूचना मिळाल्याने एस लहरी येण्यापूर्वीच आपण काळजी घेऊ शकतो.
अर्थात त्यातही सावरण्यास थोडाच काळ मिळत असतो, असे कंपनीचे संचालक जुरगेन झायबायलक यांनी म्हटले आहे. भूकंपाबाबत सध्या जे तंत्रज्ञान आधारित आहे ते पी लहरींवरच आधारित आहे. या लहरी येत असतानाच सावरून सुरक्षित उपाययोजना केल्यास जीव वाचू शकतो. जीएफझेड-पोस्टडॅमने एक अलगॉरिथम विकसित केला असून त्याच्या आधारे पी लहरी शोधणारे सॉफ्टवेअर तयार केले आहे. एस लहरी येण्याच्या अगोदर आपल्याला ७० सेकंदांचा अवधी मिळत असतो. तेवढय़ा अवधीत ही नवीन यंत्रणा काम करणार आहे त्यामुळे लोक सुरक्षित ठिकाणी म्हणजे रस्त्यावर येऊ शकतील. आताही ते येतात पण त्यात दिरंगाई होण्याची शक्यता असते. मे. टेरा टेककॉम प्रा. लि. या आस्थापनेने जर्मन कंपनीशी करार केला असून हरयाणा सरकारनेही या प्रकल्पात सहभाग घेतला आहे. राज्य सरकारने भूकंपापासून सावध करणाऱ्या यंत्रासाठी या कंपन्यांना कंत्राट दिले आहे.