ईशान्येतील काही राज्यांसह भूतानला रविवारी ५.६ रिश्टर स्केलच्या मध्यम तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपामुळे तीन जण जखमी झाले, तर एका पुरातन मंदिराचे नुकसान झाले.
राजधानी गुवाहाटीसह आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल या राज्यांसह भूतान या शेजारी राष्ट्राला सकाळी ६.३५ वाजता या भूकंपाचा धक्का जाणवला. भूकंपाचे केंद्र आसाममधील कोक्राझारनजीक जमिनीत १० किलोमीटर खोल होते, अशी माहिती हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.
या भूकंपामुळे तीन भाजीविक्रेत्यांना ना किरकोळ जखमा झाल्या, तसेच कोक्राझार रेल्वे स्थानकाजवळील एक भिंत कोसळली. चिरांग जिल्ह्य़ातील एका पुरातन मंदिरातील सिंहाचे शिल्प भूकंपाच्या धक्क्यामुळे कोलमडून पडले. जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणाला भेट दिली असून अधिक माहिती अद्याप मिळायची आहे, असे आसामच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार तिवारी यांनी दिली.
या भूकंपाच्या धक्क्य़ांमुळे मार्च महिन्यात नेपाळमध्ये झालेल्या भीषण भूकंपाच्या आठवणी नागरिकांच्या मनात जाग्या झाल्या. अनेकजण पुन्हा एकदा भयभीत झाले होते. परंतु सुदैवाने फारशी हानी न झाल्यामुळे सर्वानी सुटकेचा नि:श्वास सोडला.