राजधानी नवी दिल्लीसह उत्तर भारत सोमवारी दुपारी भूकंपाच्या तीव्र धक्क्याने हादरला. तब्बल एक मिनिटभर सुरू असलेल्या भूकंपाच्या या धक्क्यांमुळे लोक घाबरून घरे आणि कार्यालयातून बाहेर पडून रस्त्यावर जमा झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते.
आग्नेय आशियातील ७.५ रिश्टर स्केल इतक्या क्षमतेच्या भूकंपाचा सर्वाधिक फटका अफगाणिस्तान आणि पाकिस्तानला बसला आहे. अफगाणिस्तानची राजधानी असणाऱ्या काबुलमध्ये २४, तर शेजारच्या पाकिस्तानमध्ये आतापर्यंत ७६ जण मृत्यूमुखी पडल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान दरम्यानच्या हिंदूकुश पर्वतरांगाच्या परिरसरात या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. युएस जिऑलॉजिकल सर्व्हेच्या माहितीनुसार हिंदूकुश पर्वतरांगातील भूभागापासून २१२ किलोमीटर खोलवर हा केंद्रबिंदु होता. दुपारी साधारण २.४०च्या सुमारास याठिकाणी भूकंप झाल्यानंतर त्याचे जोरदार धक्के उत्तर भारतातील जम्मू-काश्मीर, दिल्ली, पंजाब, उत्तराखंड आणि राजस्थानमध्येही जाणवले.
पाकिस्तानच्या वायव्य भागातील खैबर पख्तुनवाला परिसरात २१ जणांचा मृत्यू झाला असून तब्बल २०० जण जखमी झाले आहेत. याशिवाय, अफगाणिस्तानच्या सीमावर्ती भागात असणाऱ्या बाजूर परिसरात आठजणांचा मृत्यू झाला असून ७० जण जखमी झाल्याची माहिती बचावपथकातील अधिकाऱ्यांनी दिली.