केंद्रीय अर्थव्यवहार सचिवांचे आवाहन

नोटाबंदीनंतर निर्माण झालेला अभूतपूर्व चलनताप आता कुठे कमी होत असतानाच ‘गरज असेल तरच एटीएममधून लोकांनी पैसे काढावेत. काही जण गरजेपेक्षा जास्त पैसे एटीएममधून काढतात. त्यामुळे इतरांना पैसे मिळत नाहीत. असे होऊ नये यासाठी लोकांनी उगाचच पैसे काढू नयेत,’ असे आवाहन केंद्रीय अर्थव्यवहार सचिव शक्तिकांत दास यांनी केले आहे. उत्तर प्रदेशसह पाच राज्यांत सुरू असलेल्या विधानसभा आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर चलनटंचाई निर्माण झाल्याने केंद्रीय अर्थव्यवहार सचिवांना असे आवाहन करावे लागले असल्याची चर्चा आहे.

पाचशे आणि एक हजाराच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर निर्माण झालेला चलनकल्लोळ, स्वत:चे हक्काचे पैसे बँक व एटीएममधून काढण्यासाठी लोकांना लावाव्या लागलेल्या लांबच लांब रांगा आणि पैसे काढण्यावर आलेले र्निबध या सर्व प्रकाराचा अनुभव लोकांच्या गाठीशी ताजा आहे. अलीकडे मात्र परिस्थिती सुधारू लागली असली तरी शहर परिसर वगळता निमशहरी, तालुका व ग्रामीण भागात मात्र अद्यापही चलनटंचाईचा फटका लोकांना बसत आहे. त्यातच एटीएममध्ये पुरेसे पैसे नसल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. यावर प्रतिक्रिया देताना शक्तिकांत दास यांनी ‘सरकारकडे पुरेसा चलनसाठा उपलब्ध असून एटीएममध्ये नोटांचा भरणा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. काही ठिकाणी अडचणी आहेत. मात्र, त्यांचे निराकरण करणे सुरू आहे. तरीही लोकांनी गरज असेल तेवढेच आणि तेव्हाच पैसे एटीएममधून काढावेत,’ असे स्पष्ट केले आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशसह पाच राज्यांत सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांचा प्रचार आणि राज्यात नुकत्याच संपलेल्या दहा महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमुळे चलनटंचाई निर्माण झाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

एक हजाराची नोट नाहीच

एक हजाराची नोट चलनात आणण्याचा केंद्राचा मानस नसल्याचेही दास यांनी स्पष्ट केले आहे. ५०० आणि त्याहून कमी मूल्याच्या नोटांची छपाई करण्यावर सध्या केंद्राने भर दिला आहे. त्यातच एक हजाराच्या नोटाच चलनातून बाद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुन्हा त्याच चलनाच्या नोटांची छपाई करण्याचा आमचा विचार नाही, असे दास यांनी स्पष्ट केले आहे.