* विकास दर अवघा पाच टक्केच राहणार
* केंद्रीय सांख्यिकी संघटनेचा अंदाज
चालू आर्थिक वर्षांत देशाचा आर्थिक विकास दर पाच टक्क्यांच्या आसपास रेंगाळणार असल्याचे गुरुवारी केंद्रीय सांख्यिकी संघटनेने वर्तविलेल्या अंदाजावरून स्पष्ट झाले आहे. हे अनुमान अपेक्षेपेक्षा कमी असून, अर्थव्यवस्थेत प्राण फुंकण्याचा केंद्र सरकार यापुढेही प्रयत्न करीत राहील, असे अर्थ मंत्रालयाने या निराशाजनक भाकितानंतर म्हटले आहे. दुसरीकडे केंद्रीय नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष माँटेकसिंग अहलुवालिया यांनी केंद्रीय सांख्यिकी संघटनेच्या अनुमान पद्धतीवर प्रश्नचिन्ह लावले आहे.
केंद्रीय सांख्यिकी संघटनेच्या आकडेवारीनुसार, गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत कृषी, उत्पादन आणि सेवा क्षेत्रांचा विकास दर गडगडला आहे. कृषी क्षेत्राचा विकास दर ३.६ टक्क्यांवरून १.८ टक्क्यांवर आला आहे.
उत्पादन क्षेत्रातील वाढ २.७ टक्क्यांवरून १.९ टक्के इतकी नोंदविण्यात आली आहे, तर सेवा क्षेत्रात विकासाचा दर ८.२ टक्क्यांऐवजी ६.६ टक्के राहण्याची शक्यता आहे. पण, अर्थव्यवस्थेतील मंदीची स्थिती संपत आली असून, त्याची दखल या संघटनेने घेतलेली नसावी, असे मत अहलुवालिया यांनी व्यक्त केले. या संघटनेने एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यानचीच आकडेवारी विचारात घेतली असल्याचा दावा त्यांनी केला.
केंद्रीय सांख्यिकी संघटनेच्या आगाऊ अंदाजानुसार २०१२-१३ या आर्थिक वर्षांत भारताचा आर्थिक विकास दर ५ टक्क्यांच्या आसपास राहण्याची चिन्हे आहेत.
आधीच्या आर्थिक वर्षांत म्हणजे २०११-१२ दरम्यान विकासदर ६.२ टक्के होता. नोव्हेंबर महिन्यानंतर अर्थव्यवस्थेत बऱ्यापैकी तेजी आल्यामुळे अंतिम आकडे गुरुवारी वर्तविण्यात आलेल्या अनुमानापेक्षा चांगले असतील, अशी आशा अर्थ मंत्रालयाने पत्रकाद्वारे व्यक्त केली. चालू आर्थिक वर्षांत आर्थिक विकासाचा दर ५.५ टक्के राहील, असे रिझव्‍‌र्ह बँकेला वाटते, तर केंद्र सरकारच्या मते विकासाचा दर ५.७ टक्के असेल.