दक्षिण अमेरिकेतील इक्वेडोरमध्ये रविवारी सकाळी ७.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. या शक्तीशाली भूकंपामुळे आतापर्यंत ४१ नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. हा धक्का इतका मोठा होता की इक्वेडोरची राजधानी क्वीटोमधील अनेक इमारतींना भेगा पडल्या आहेत. तसेच भूकंपानंतर त्सुनामीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. स्थानिक वृत्तानुसार काही भागांमध्ये घराची छते कोसळली आहेत तर एक उड्डानपूलही कोसळल्याची माहिती आहे.
उपराष्ट्रपती जॉर्ज ग्लेस यांच्या माहितीनुसार, आजूबाजूच्या सहा शहरांमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे. या भागात बचावकार्यासाठी नॅशनल गार्ड तैनात करण्यात आले आहेत. भूकंपाचं मुख्य केंद्र आग्नेय समुद्रकिनाऱ्यावरील ईज्नेजवळ होतं. भूकंपाच्या केंद्राच्या ३०० किमी क्षेत्रातील समुद्रकिनाऱ्याजवळच्या परिसरात उंच लाटांची शक्यता आहे, असं पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरने सांगितलं.