हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारात देण्यात आलेल्या लाचप्रकरणी सक्तवसुली  संचालनालयाने (ईडी) मंगळवारी ऑगस्टा वेस्ट लॅण्ड कंपनीशी संबंधित एका कंपनीच्या माजी संचालक मंडळाचे सदस्य गौतम खेतान यांना अटक केली. याप्रकरणी करण्यात आलेली ही पहिलीच अटक आहे.
अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा ३६०० कोटी रुपयांचा करार ऑगस्ट वेस्टलॅण्ड कंपनीबरोबर करण्यात आला होता. या व्यवहारासाठी ३६० कोटी रुपयांची लाच देण्यात आल्याचा आरोप झाल्याने खळबळ माजली होती.
गौतम खेतान हे उद्योगपती आणि वकील असून राजधानीतील त्यांच्या दोन निवासस्थानांवर छापे टाकण्यात आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. या लाचप्रकरणी त्यांची अधिक चौकशी करण्यात येणार आहे, असे अंमलबजावणी संचालनालयाच्या सूत्रांनी सांगितले.
छापे टाकल्यानंतर अधिकाऱ्यांनी एका कोटी रुपये किमतीचे जडजवाहीर आणि काही महत्त्वाचा दस्तऐवज त्यांच्या निवासस्थानांमधून ताब्यात घेतला. गेल्या जुलै महिन्यांत याबाबत एफआयआर नोंदविल्यानंतर संचालनालयाने केलेली ही मोठी कारवाई आहे.
चंडीगडमधील एअरोमॅट्रिक्स हा कंपनीच्या संचालक मंडळाचे खेतान हे सदस्य होते. हेलिकॉप्टर खरेदी करारासंदर्भात आर्थिक व्यवहार करण्यात ही कंपनी अग्रेसर होती. या कंपनीमार्फतच निधीचा व्यवहार झाल्याचे अधिकाऱ्यांना आढळले आहे.
इटालीतील न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या अहवालात खेतान यांचे नाव नमूद करण्यात आले असल्याचा संदर्भही दिला जात आहे. मात्र स्वत: खेतान यांनी सर्व आरोपांचे जोरदार खंडन केले आहे.