माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांना सक्तवसुली संचालनालयाने मंगळवारी समन्स बजावला. टू जी घोटाळ्यामधील एअरसेल-मॅक्सिस व्यवहारासंदर्भात सक्तवसुली संचालनालयाकडून सुरू असलेल्या तपासासंदर्भात चौकशीसाठी समन्स बजावण्यात आला आहे.
कार्ती यांनी स्वतः किंवा त्यांच्याकडून नेमण्यात आलेल्या अधिकृत प्रतिनिधीने याच आठवड्यात सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात उपस्थित राहून आर्थिक व्यवहाराची कागदपत्रे सादर करण्याचे समन्समध्ये बजावण्यात आले आहे. गेल्यावर्षीपासून सक्तवसुली संचालनालयाकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पहिल्यांदाच कार्ती चिदंबरम यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे.
या प्रकरणाचा तपास करणारे तपास अधिकारी आणि सक्तवसुली संचालनालयाचे उपसंचालक राजेश्वर सिंग यांनी समन्स जारी केला असून, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कार्ती यांनी कागदपत्रे जमविण्यासाठी आणखी वेळ देण्याची मागणी केली आहे.
अॅडव्हांटेज स्ट्रॅटेजिक कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि चेस ग्लोबल अॅडव्हायजरी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या दोन्ही कंपन्यांवर कार्ती चिदंबरम हे संचालक होते. या दोन्ही कंपन्यांवर ‘प्रिव्हेंन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट’नुसार नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.