सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) वादग्रस्त धर्मप्रसारक डॉ. झाकीर नाईकला सोमवारी समन्स बजावले आहे. झाकीर नाईकला ईडीने समन्स बजावल्याची ही चौथी वेळ असून यानंतर आता झाकीर नाईकने समन्सकडे दुर्लक्ष केल्यास झाकीरच्या अटक वॉरंटसाठी न्यायालयात जाऊ असा इशाराच ईडीमधील अधिका-यांनी दिला आहे.

सोमवारी ईडीने झाकीर नाईकला त्याच्या वकिलामार्फत तसेच ई मेलमार्फत चौथ्यांदा समन्स बजावले आहे. चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहावे असे ईडीने म्हटले आहे. झाकीर नाईकला समन्स बजावण्याची ही शेवटची वेळ आहे. आता त्याच्याविरोधात अटक वॉरंट काढण्यासाठी न्यायालयात जाऊ अशी माहिती अधिका-यांनी दिली आहे.

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात गुन्हा नोंदवल्यानंतर ‘ईडी’ने झाकीर नाईकला वारंवार समन्स बजावले आहे. काही दिवसांपूर्वी झाकीर नाईकने त्याच्या वकीलांमार्फत ईडीला उत्तर दिले होते. प्रत्यक्ष हजर होण्याबाबत नाईकने काही महिन्यांची मुदत मागून घेतली होती. तसेच स्काइप, फोनवरून ‘ईडी’च्या चौकशीला सामोरा जाण्यास तयार आहे, ‘ईडी’ला हवी असलेली सर्व कागदपत्रे, माहिती देण्याची तयारी आहे, असे नाईकने म्हटले होते. पण ईडीने झाकीर नाईकची मागणी फेटाळून लावली होती. आर्थिक गैरव्यवहारांतर्गत अशा प्रकरची तरतूद नसल्याचे ईडीच्या अधिका-यांनी म्हटले होते.

मी अनिवासी भारतीय आहे. त्यामुळे ‘ईडी’ने धाडलेले एकही समन्स माझ्या मूळ पत्त्यावर मिळालेले नाही. इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर बंदी घालण्यात आली. त्याविरोधात दिल्ली व मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी प्रलंबित आहेत असे झाकीरने म्हटले होते. दरम्यान, यापूर्वी ईडीने नाईकची बहीण नायला नुरानी व तिचे पती नौशाद या दोघांना ईडीने समन्स धाडून बुधवापर्यंत चौकशीसाठी हजर राहा, असे म्हटले होते. मात्र या दोघांनीही ईडीकडे आठवडय़ाची मुदत मागितली होती.