श्रीनगरच्या काही भागात संचारबंदी उठवली

काश्मीरमध्ये लागोपाठ ४६ व्या दिवशी जनजीवन हे काही र्निबध व हिज्बुलने पुकारलेल्या बंदमुळे विस्कळीतच राहिले असून आता श्रीनगरमधील बहुतांश भागातील संचारबंदी उठवण्यात आली आहे. हिज्बुलचा कमांडर बुरहान वानी ८ जुलैच्या चकमकीत मारला गेल्यानंतर काश्मीरमध्ये अनेक दिवस संघर्ष सुरू आहे. श्रीनगरच्या अनेक भागातून संचारबंदी उठवण्यात आली. दरम्यान, शहराच्या बाटमालू, मैसुमा, क्लाखुड या भागात संचारबंदी कायम आहे.

दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग शहरात संचारबंदी कायम आहे. काश्मीर खोऱ्यातील इतर भागात परिस्थिती सुधारत असल्याने तेथील र्निबध शिथिल करण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले, की आठ तासांत १२ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील संचारबंदी काल सकाळी नऊ वाजेपासून उठवण्यात आली आहे. त्यात अनुचित प्रकार न घडल्याने संचारबंदी पुन्हा लावण्यात आलेली नाही. काश्मीर खोऱ्यात दगडफेकीचे किरकोळ पाच प्रकार वगळले तर काल शांतता होती.

संचारबंदी उठवल्याने लोकांना दैनंदिन कामांना उसंत मिळाली आहे. लाल चौक भागात गाडय़ांची वाहतूक वाढलेली दिसत होती. अधिकाऱ्यांनी सांगितले, की असे असले तरी काश्मीर खोऱ्यात प्रतिबंधात्मक आदेश कायम ठेवण्यात आले आहेत.

बुरहान वानी हा चकमकीत मारला गेल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारानंतर निदर्शनात ६५ जण मारले गेले, त्यात दोन पोलिसांचा समावेश होता. हजारो लोक या निदर्शनांच्या वेळी चकमकीत जखमी झाले होते. वानी हा अनंतनाग जिल्ह्य़ात कोकेरनाग येथे सुरक्षा दलांशी चकमकीत ८ जुलैला मारला गेला, त्यानंतर निदर्शने सुरू झाली होती. अजून शैक्षणिक संस्था, खासगी कार्यालये व पेट्रोल पंप बंद आहेत. सार्वजनिक वाहतूक सुरू झालेली नाही. मोबाइल इंटरनेटही बंद असून प्रीपेड मोबाइलवर आउटगोइंग सेवा बंद आहे.