शिक्षणाचा ढासळता दर्जा सावरण्यासाठी गांभीर्याने व सहेतुक प्रयत्न करणे गरजेचे आहे; शिवाय आयआयटी व एनआयटीसारख्या संस्थांनी व्यावासायिक सक्षम मनुष्यबळाची निर्मिती केलीच पाहिजे तरच भारताच्या आशाआकांक्षा पूर्ण होतील, असे मत राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी व्यक्त केले.
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेच्या पहिल्या पदवीदान समारंभात त्यांनी सांगितले, की शिक्षण संस्थांची क्रमवारी करण्याच्या पद्धतीवर भर दिला पाहिजे, तरच या शिक्षणसंस्थांमध्ये स्पर्धा निर्माण होईल. आपल्याकडे नामांकित अभियांत्रिकी संस्था आहेत पण त्या मोजक्याच आहेत; शिवाय त्या आंतरराष्ट्रीय क्रमवारीत मागे पडतात. त्याचबरोबर विविध संस्थांतील शिक्षणाचा घसरता दर्जा रोखला पाहिजे. एनआयटीसह सर्व संस्थांमध्ये स्पर्धा वाढीस लागली पाहिजे.
अरुणाचलात एनआयटीची स्थापना २०१० मध्ये झाली होती. आता राष्ट्रीय पातळीवर क्रमवारी पद्धत सुरू झाली आहे. ही चांगली बाब असून त्यामुळे शिक्षण संस्था प्रगती करू शकतील, असे सांगून ते म्हणाले, की आंतरशाखीय अभ्यासक्रमांवर भर दिला पाहिजे. शैक्षणिक क्षेत्राशिवाय एनआयटीने समाजाच्या इतर शाखांचाही विचार केला पाहिजे. लोकांच्या नेमक्या समस्या काय आहेत, विकासात कुठे अडथळे येत आहेत हे पाहून त्यांचे शैक्षणिक व इतर संशोधन त्यावर उत्तरे शोधण्यासाठी वापरले पाहिजे. अभियांत्रिकी संस्थांची जबाबदारी मोठी आहे, त्यात आयआयटी व एनआयटीवर आपली भिस्त आहे. त्यांनी सामाजिक भान व व्यावसायिक कुशलता असलेले मनुष्यबळ घडवले, तर भारताच्या आशाआकांक्षा पूर्ण होतील.