मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर केजरीवाल यांनी रामलीला मैदानातील उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले.  ते म्हणाले की, भाजप आणि कॉंग्रेसचा पराभव अहंकारामुळे झाला असल्याचे आम्हाला लक्षात ठेवावे लागेल. आमच्यात अहंकार आला तर आमचीही तशीच स्थिती होईल. त्यामुळे आम्हाला चौकस राहावे लागणार आहे.  गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला अहंकाराची बाधा झाली.  लोकसभा निवडणुकीत आपने देशभरातील जागा लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्या निवडणुकीत आपची अवस्था काय झाली हे सर्वांनीच बघितले होते. त्यामुळे आता आपच्या नेत्यांनी सांभाळून रहावे अशा शब्दात त्यांनी पक्षातील नेत्यांचेही कान टोचले. तसेच, सध्याच इतर राज्यांच्या निवडणुकांमध्ये उतरणार नसल्याचे स्पष्ट केले. म्हणजे आप केवळ दिल्लीच्या विकासावर भर देणार आहे.   दिल्लीत आम्हाला बहुमत मिळाले आहे. केंद्रात भाजपकडे बहुमत आहे. अशा वेळी दोघांनी मिळून काम केले तर दिल्लीचा सर्वांगिण विकास साधता येईल. आम्ही भाजपच्या किरण बेदी आणि कॉंग्रेसच्या अजय माकन यांची सरकार चालवण्यात मदत घेणार आहोत. दिल्लीतून भ्रष्टाचार दूर करायचा आहे. गुंडागर्दी मिटवायची आहे. एखादा व्यक्ती आपची टोपी घालून गुंडागर्दी करणार असेल तर त्याला लगेच पकडा. तो निश्चितच आपचा कार्यकर्ता नाही. पोलिसांनी त्याला दुहेरी शिक्षा करावी.