श्रीनगरातील जामा मशिदीबाहेर जमावाने एका उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्याला ठेचून मारल्यानंतर, सार्वजनिक ठिकाणी ईदची प्रार्थना करणे टाळावे, असा सल्ला जम्मू व काश्मीर पोलिसांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिला आहे.

पोलीस कर्मचाऱ्यांनी जिल्हा पोलीस लाइन्स किंवा संरक्षित मशिदींमध्ये प्रार्थना करावी, असे त्यांना सांगण्यात आले आहे. ही सूचनावली सर्व पोलीस ठाणी, जम्मू-काश्मीर पोलिसांचे सर्व विभाग, लष्कराचे चिनार कॉर्प्स, आयटीबीपी, एसएसबी, सीआरपीएफ, बीएसएफ व सीआयएसफ यांना पाठवण्यात आली आहे. वस्तीपासून दूर किंवा सर्वसाधारण मशिदीत किंवा ईदगाहमध्ये ईदची प्रार्थना न करण्याची सूचना तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना द्याव्यात, असे काश्मीरच्या पोलीस महानिरीक्षकांच्या वतीने पोलीस नियंत्रण कक्षाने काश्मीर खोऱ्यातील सर्व पोलीस ठाण्यांना पाठवलेल्या सूचनावलीत म्हटले आहे. इतर जिल्ह्य़ांमध्येही ईदची प्रार्थना जेथे तुमचे कर्मचारी सुरक्षित राहतील अशा जिल्हा पोलीस लाइन्समधील मशिदीत किंवा संरक्षित मशिदींमध्ये केली जावी, असे यात नमूद केले आहे.