गेल्या काही दिवसांमध्ये देशभरात दहशतवादी कृत्याचा भाग असलेल्या रेल्वे अपघातांच्या घटना उघडकीस येत असतानाच उत्तर प्रदेशात आणखी एक एक्स्प्रेस गाडी रूळावरून घसरली आहे. जबलपूर- निझामउद्दीन एक्स्प्रेस गाडीचे आठ डबे गुरूवारी सकाळी रूळांवरून घसरले. मात्र, या अपघातामागे दहशतवाद्यांच्या हात आहे किंवा नाही, याची अद्याप पुष्टी झालेली नाही. पीटीआयच्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या महोबा स्थानकाजवळ महाकौशल एक्स्प्रेसचे डबे पहाटे दोनच्या सुमारास रूळांवरून खाली घसरले. या घटनेची माहिती मिळताच बचावपथकांनी घटनास्थळी धाव घेतली. महोबा आणि कुलपहाड स्थानकांदरम्यान एक्स्प्रेस गाडीचे आठ डबे घसरले आहेत. या घटनेनंतर रेल्वेचे अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. सध्या हे अधिकारी याठिकाणच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, जखमींच्या नातेवाईकांना माहिती देण्यासाठी झासी, ग्वाल्हेर, बांदा आणि निझामुद्दीन स्थानकांवर हेल्पलाईन सुरू करण्यात आल्या आहेत.

गेल्या काही दिवसांमध्ये उत्तर प्रदेशात रेल्वे अपघातांचे प्रमाण वाढले असून यामागे घातपाताचा कट असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे सरकारकडून या सर्व घटनांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील मध्यंतरी एका भाषणात कानपूर रेल्वे अपघाताचा उल्लेख करताना यामागे सीमेपलीकडील लोकांचा हात असल्याचे म्हटले होते. एकुणच रेल्वे खात्यासाठी नवीन वर्षाची सुरूवात चांगली ठरलेली नाही. जानेवारी महिन्यात आंध्र प्रदेशात जगदलपूर-भुवनेश्वर हिराकांड एक्स्प्रेस रूळावरून घसरून ४१ जणांचा मृत्यू झाला होता, तर ६० जण जखमी झाले होते. त्यानंतर ७ मार्चला भोपाळ-उज्जैन पॅसेंजर ट्रेनमध्ये झालेल्या स्फोटात नऊजण जखमी झाले होते.