मृतांमध्ये पाच महिलांचा समावेश
छत्तीसगड राज्यातील सुकमा जिल्ह्यात घनदा जंगलात पोलिसांशी झालेल्या चकमकीत आठ माओवादी मारले गेले असून त्यात पाच महिलांचा समावेश आहे. तेलंगणमधील खम्मम जिल्ह्य़ानजीक ही चकमक पहाटे झाली, असे पोलिसांनी सांगितले.
तेलंगणचे ग्रेहाउंड पथक व माओवादी यांच्यात रायपूरच्या दक्षिणेला ५०० किलोमीटर अंतरावर असलेल्या साकलेर येथे चकमक झाली. माओवादी हल्ला करण्याचा कट आखत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथके सीमावर्ती भागात दोनतीन दिवस तपास करीत होती, असे तेलंगणचे पोलिस महासंचालक अनुराग शर्मा यांनी सांगितले. सकाळी साडेसात वाजता छत्तीसगड व तेलंगण पोलिसांची पथके शोध घेत असताना माओवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला. त्यात आठ माओवादी ठार झाले. सर्व आठ मृतदेह खम्मममधील भद्राचलम येथे आणण्यात आले. बस्तरचे पोलिस महानिरीक्षक एसआरपी कल्लुरी यांनी सांगितले, की मरण पावलेल्या माओवाद्यांत गोट्टीमुकला रमेश ऊर्फ लछना (वय ५२) या विभागीय समिती कमांडरचा समावेश असून तो आंध्रातील गुंटूरचा आहे.