पैशाचा वापर केल्याने कारवाई
मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी पैशांचा वापर करण्यात आल्याचे पुरावे हाती आल्याने तामिळनाडू विधानसभेच्या दोन जागांसाठीची निवडणूक रद्द करावी, अशी शिफारस निवडणूक आयोगाने शनिवारी केली. या घडीला तेथे लोकशाही मार्गाने निवडणूक घेण्याइतके पोषक वातावरण नाही, असेही आयोगाने म्हटले आहे.
सदर दोन मतदारसंघांतून आठ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे २५ हजार लिटरहून अधिक मद्य, चांदी, धोतर, साडय़ा अशा स्वरूपाच्या भेटवस्तू मोठय़ा प्रमाणावर जप्त करण्यात आल्याचेही आयोगाने म्हटले आहे.
निवडणुकीत मोठय़ा प्रमाणावर गैरव्यवहार झाले असतील, बळाचा वापर करण्यात आला असेल अथवा मतदान केंद्र ताब्यात घेण्याचे प्रकार घडले असतील तर निवडणूक रद्द केली जाते, मात्र मतदारांना पैशांचे वाटप करण्यात आल्याने आयोगाने प्रथमच निवडणूक रद्द करण्याची शिफारस केली आहे.
अरावकुरिची आणि तंजावूर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीची अधिसूचना रद्द करावी, अशी शिफारस आयोगाने राज्यपाल के. रोसय्या यांना केली आहे. येत्या काही दिवसांतच येथे निवडणुका कधी घ्याव्यात याचे वेळापत्रक राज्यपालांना सादर करण्यात येईल, असे आयोगाने म्हटले आहे.
आपल्या २९ पानांच्या शिफारशींमध्ये आयोगाने रोसय्या यांनी नोंदविलेले निरीक्षणही नमूद केले आहे. या दोन मतदारसंघांतील निवडणूक पुढे ढकलली तर निवडून येणाऱ्या उमेदवारांना राज्यसभा निवडणुकीत मतदानापासून वंचित राहावे लागेल, असे रोसय्या यांनी म्हटले आहे. राज्यसभेच्या निवडणुका घेण्यासाठी विधानसभेतील सर्व जागा भरलेल्याच असल्या पाहिजेत असा कायदा नाही, असेही आयोगाने म्हटले आहे.
या मतदारसंघांतील निवडणुका प्रथम १६ मे ऐवजी २३ मे रोजी घेण्याचे ठरले. त्यानंतर या निवडणुका १३ जून रोजी घेण्याचा निर्णय आयोगाने २१ मे रोजी घेतला. निरीक्षक, विशेष पथके आणि अन्य संबंधितांनी दिलेल्या अहवालानंतर वरील निर्णय घेण्यात आल्याचे आयोगाने म्हटले आहे.
अरावकुरिची आणि तंजावूर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीची अधिसूचना रद्द करावी, अशी शिफारस आयोगाने राज्यपाल के. रोसय्या यांना केली आहे.