निवडणूक आयोगाने काँग्रेसमधील अंतर्गत निवडणुकांची (संघटनेतील निवडणूक) मुदत सहा महिन्यांनी वाढवली आहे. निवडणूक आयोगाने काँग्रेसला अंतर्गत निवडणुकांसाठी ३० जूनपर्यंतची मुदत दिली होती. मात्र आता या मुदतीत वाढ करण्यात येईल. त्यामुळे काँग्रेसला ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत पक्षांतर्गत निवडणूक घ्यावी लागेल. काँग्रेसच्या अंतर्गत निवडणुकीत राहुल गांधी यांच्याकडे नेतृत्त्वाची धुरा दिली जाऊ शकते. त्यामुळे आता राहुल गांधी यांच्याकडे पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी ६ महिन्यांचा कालावधी आहे. काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या माध्यमातून अंतर्गत निवडणुकांसाठी सहा महिन्यांचा अतिरिक्त कालावधी देण्याची मागणी करण्यात आली होती.

अंतर्गत निवडणुकांचा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी आवश्यक असल्याचे काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटले होते. त्यामुळे निवडणूक आयोगाने काँग्रेसला सहा महिन्यांचा अतिरिक्त कालावधी दिला आहे. मात्र यासोबतच निवडणूक आयोगाने काँग्रेसला डिसेंबर २०१७ च्या आधीच अंतर्गत निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्याची तंबी दिली आहे. डिसेंबर २०१७ ही अंतिम मुदत असेल, असे निवडणूक आयोगाने काँग्रेसला सांगितले आहे. ‘३१ डिसेंबरनंतर मुदत वाढवली जाणार नाही,’ असे निवडणूक आयोगाने स्पष्ट शब्दांमध्ये काँग्रेसला सांगितले आहे.

उत्तर प्रदेशातील दारुण पराभवामुळे काँग्रेस पक्षात निराशा आली आहे. त्यामुळे पक्षांतर्गत बदल करण्यासाठी नेतृत्त्वावर दबावदेखील वाढला आहे. ‘निवडणूक आयोगाने संघटनात्मक निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाला ६ महिन्यांचा अतिरिक्त कालावधी दिला आहे. काँग्रेसची विनंती निवडणूक आयोगाने मान्य करत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यास सहा महिन्यांची मुदत दिली आहे. त्यामुळे ३० जूनऐवजी ३१ डिसेंबरपर्यंत पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करता येईल,’ अशी माहिती काँग्रेस महासचिव जनार्दन द्विवेदी यांनी दिली आहे.

‘३० जूनसाठी आता खूपच कमी वेळ शिल्लक राहिला आहे. इतक्या कमी कालावधीत निवडणुकीची प्रक्रिया पार पाडता येणार नाही. त्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी वाढवून देण्याची विनंती निवडणूक आयोगाला करण्यात आली होती. निवडणूक आयोगाकडून ही विनंती मान्य करण्यात आली,’ अशी माहिती जनार्दन द्विवेदी यांनी दिली.